esakal | लॉकडाऊन चार टप्प्यांत उठवावा; कोणत्या राज्यातून आली सूचना, वाचा कोठे काय घडले!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-in-India

केरळ सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने लॉकडाउन चार टप्यांत उठविण्यात यावे अशी शिफारस केली आहे. या कृती दलात १७ सदस्यांचा समावेश आहे. माजी मुख्य सचिव के. एम. अब्राहम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्यमंत्री पिनरई विजयन यांना सोमवारी सायंकाळी अहवाल सादर केला. कोरोना संसर्ग झालेल्या राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि १४ एप्रिलनंतर टप्याटप्यांत लॉकडाउन उठवावा असे त्यात म्हटले आहे.

लॉकडाऊन चार टप्प्यांत उठवावा; कोणत्या राज्यातून आली सूचना, वाचा कोठे काय घडले!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

आंध्रप्रदेश - बांगड्यांची चमक फिकी
आर. एच. विद्या

हैदराबाद - हैदराबादमधील चारमिनारच्या भेटीत पर्यटक तेथील लाड बाजारात लाखेच्या रंगबेरंगी बांगड्या घेतल्याशिवाय परतत नाही. देशभरात या बांगड्यांना मोठी मागणी असून अनेक कारागिरांचे पोट या व्यवसायावर आहे. मात्र सध्या कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे शहरातील बांगड्या व्यवसाय पूर्णपणे बंद असून कारागीर व मजुरांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हैदराबादमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या कारागिरांना काम मिळालेले नाही. जुन्या शहरातील अमननगर, तालाबकट्टा, नशमनगर, सिद्दिकीनगर, आणि सुलतान शाही अशा काही भागांतील खोल्यांमध्ये दिवसा बांगड्यांचे कारखाने सुरु असतात तर रात्री त्याचेच रूपांतर घरांमध्ये होते. 

कोरोना कुमार, कोरोना कुमारी
आंध्र प्रदेशमधील कडपा जिल्ह्यात मंगळवारी जन्मलेल्या दोन बाळांची नावे कोरोनावरुन ठेवली आहेत. बालकाचे नाव ‘कोरोना कुमार’ तर बालिकेचे नाव ‘कोरोना कुमारी’ ठेवले आहे. त्यांच्या या निर्णयाला बाळांच्या आईवडिलांनी मान्यता दिली आहे. या दोन्ही कुटुंबाकडून रुग्णालयाचे शुल्क घेणार नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. सध्या कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या काळात ही सुदृढ बाळे जन्माला आली आहेत.

केरळ - लॉकडाउन चार टप्प्यांत उठवावा
अजय कुमार

तिरुअनंतपुरम - केरळ सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने लॉकडाउन चार टप्यांत उठविण्यात यावे अशी शिफारस केली आहे. 

या कृती दलात १७ सदस्यांचा समावेश आहे. माजी मुख्य सचिव के. एम. अब्राहम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्यमंत्री पिनरई विजयन यांना सोमवारी सायंकाळी अहवाल सादर केला. कोरोना संसर्ग झालेल्या राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि १४ एप्रिलनंतर टप्याटप्यांत लॉकडाउन उठवावा असे त्यात म्हटले आहे. त्यानुसार सरकार आपल्या प्रतिसादाची दिशा ठरवून केंद्राला कळविणार आहे.

कासारगोड, तिरुअनंतपुरम, कन्नूरसह सात ‘हॉटस्पॉट’मध्ये लोकांच्या हालचालींवरील निर्बंध कायम राहतील. रुग्णांची संख्या कमी झालेल्या ठिकाणी सवलत देता येईल.

दोन दिवस सूट
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मोबाईल दुकाने, वाहन दुरुस्तीची वर्कशॉप आणि सुट्या भागांची दुकाने अशा ठिकाणांसाठी लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. लोकांना वाहन दुरुस्ती करणे आवश्‍यक असल्यामुळे रविवारी व गुरुवारी ही दुकाने सुरू राहतील. 

ओडिशा - राज्यात कोरोनाचा पहिला बळी
स्मृती सागरिका कानुनगो

भुवनेश्‍वर - ओडिशात कोरोनाव्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. भुवनेश्‍वरमधील ‘एम्स’मध्ये उपचार घेत असलेल्या ७२ वर्षांच्या वृद्धाचे काल निधन झाले. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने मंगळवारी दिली.

संबंधित वृद्धाला श्‍वसनाच्या त्रास होऊ लागल्याने शनिवारी (ता. ४) ‘एम्स’मध्ये दाखल केले होते. त्यांना अति उच्च रक्तदाबाचा त्रासही होता. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांना एकांतवासात ठेवण्याचे काम सुरु आहे. राज्यात आज आणखी एक बाधित रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४२ झाली आहे.

राज्यात हेल्पलाइन सुरु
कोरोनाव्हायरसवर वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी हेल्पलाइन सेवा राज्यात सुरू केली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते याचे आज उद्घाटन झाले. ज्यांना खोकला, ताप, नैराश्‍य, श्‍वसनाचा त्रास जाणवत असेल तर ते या हेल्पलाइनवरुन मदत मागू शकतात ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

गुप्तचर विभागाचे कार्यालय बंद
भुवनेश्‍वर महानगरपालिकेने शहरातील गुप्तचर विभागाचे (आयबी) कार्यालय कोरोनामुळे बंद केले आहे. 

घराबाहेर मास्क बंधनकारक
घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क किंवा रुमाल, कापड अशा अन्य साधनांनी तोंड व नाक झाकण्याची सक्ती केली आहे. 

दहावीसाठी ऑनलाइन वर्ग
दहावीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून ‘दीक्षा’ या मोबइल ॲपवरुन त्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.