कोरोनाबाबत देशात ही समाधानकारक बातमी; फक्त सावध राहा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 10 April 2020

एप्रिलमधील सर्व उत्सव रद्द
कोरोना संसर्गाची व्याप्ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्यातील देशभरातील सर्व, सण उत्सव आणि धार्मिक समारंभ रद्द केले जावेत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. देशभर लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन केले जावे. विविध राज्य सरकारांनी कोठेही धार्मिक अथवा सार्वजनिक कार्यक्रम होऊ देऊ नयेत, लोकांना एकत्र येऊ देऊ नये असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाचे उदाहरण अद्यापसमोर आलेले नाही त्यामुळे रुग्णसंख्येच्या आकड्यावरून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केंद्र सरकारने देशवासीयांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते देशाला संबोधित करून लॉकडाउनचा  कालावधी वाढविण्यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील चोवीस तासांमध्ये ३६ मृत्यू झाले असून नऊशेपेक्षाही अधिक लोकांना याचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेणे आणि संयम राखणे आवश्यक आहे अशी पुस्ती आरोग्य मंत्रालयाने जोडली. देशातील विविध राज्यांतील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले की, कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे. राज्य सरकारांना औषधे आणि उपकरणांची कमतरता भासू नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.  

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या गोळ्यांना जगभरातून मागणी आहे. मात्र देशांतर्गत मागणी आणि यांचे प्रमाण याचा समतोल राखूनच विविध देशांना भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. देशाला सध्या एक कोटी गोळ्यांची गरज आहे. भारताकडील सध्याचा साठा ३ कोटी २९ लाख गोळ्या इतका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काल एका दिवसात देशात कोरोनाच्या सोळा हजार दोन चाचण्या घेण्यात आल्या, यामध्ये ०.०२ टक्के इतक्या लोकांना कोरोनाची प्रत्यक्ष लागण झाल्याचे आढळले असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. अर्थात परिस्थिती गंभीर वाटत नसली तरी गाफील राहून चालणार नाही आणि लढाई कुठेही ढिली करूनही चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे कटाक्षाने  पालन करावे असे आवाहन त्यांनी पुन्हा केले.

आरोग्यमंत्र्यांचा संवाद
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना युद्धात केंद्राकडून सुरू असलेल्या उपाययोजना आणि राज्यांना देण्यात येणारी मदत याबाबत त्यांनी चर्चा केली. कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्याची सूचना अनेक राज्यांनी केली. त्याचप्रमाणे वैयक्तिक सुरक्षा उपकरणे - पीपीई तसेच इतर वैद्यकीय मदत राज्यांना केंद्राकडून वेळेवर पोहोचली पाहिजे अशीही मागणी आरोग्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्रात केवळ मुंबईमध्ये ५००० पीपीईची आवश्यकता आहे असेही सांगण्यात आले आले. देशातील एकूण मृत्यूसंख्येच्या निम्मे लोक एकट्या महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले आहेत.

मोदींची वाराणसीतील जनतेशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाराणसी मतदारसंघातील नागरिकांशी  पुन्हा चर्चा केली आणि घरातून बाहेर पडताना किंवा तोंडाला रुमाल बांधूनच बाहेर पडा असे आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील करण्याबाबत सरकारकडून विचार केला जाऊ शकतो. लॉकडाउनचा कालावधी वाढवला तरी सार्वजनिक वाहतुकीसह शिक्षण व धार्मिक संस्था आणि आंतरराज्य प्रवास यावरील बंदी कायम ठेवून रोजगारसृजन होण्यासाठी काही क्षेत्रातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटविण्यात यावे का, याबाबतचा निर्णय केंद्राकडून होण्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून समजते. रेल्वे व विमान वाहतूक क्षेत्रातील निवडक सेवांना परवानगी देण्याची मागणीही समोर आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus india update 10th april 2020 marathi