देशातील कोरोनाच्या घडामोडी एका क्लिकवर; वाचा दिवसभरात काय घडले?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 26 मार्च 2020

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, या रुग्णांनी विदेशात प्रवास केला आहे किंवा विदेशात जाऊन आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात हे रुग्ण आले आहेत.

नवी दिल्ली Coronavirus:भारतात सध्या कोरोना बाधितांची संख्या 649च्या वर गेली आहे. त्यातील 10 जणांचा मृत्यू झाला असून, जगातील मृतांची संख्या 21 हजारांच्याही पुढं गेलीय. जगभरात जवळपास दोन लाख 65 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात ज्यांना लागण झाली आहे त्यापैकी जवळपास सगळेच विदेशात जाऊन आले आहेत किंवा विदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. भारतात 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉक डाऊन असल्यामुळं जनजीवन ठप्प आहे. सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आल्यामुळं गेल्या दोन दिवसांपासूनचे भीतीचे वातावरण हळू हळू निवळताना दिसत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारकडून पॅकेजची घोषणा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं एक लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीय. त्यात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच आहे. पंतप्रधान अन्न कल्याण योजनेमार्फत 10 किलो गहू, तांदूळ आणि एक किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. देशातील 80 कोटी नागरिकांना याचा लाभ होईल. या योजनेतून 3 महिने मोफत पुरवठा होणार आहे. रोजगार हमीच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतील. तर, 69 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार जमा होणार आहेत.

आणखी वाचा - मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीय का?

एकही विमान येणार नाही!
भारतात संपूर्ण लॉक डाऊन असताना कोणतेही आंतरराष्ट्रीय विमान प्रवेश करणार नाही. या संदर्भात आज, केंद्र सरकारने घोषणा केली आहे. यापूर्वी भारताने 22 मार्चपासून आठवडाभरासाठी आंतरराष्ट्रीय विमानांना बंदी केली होती. पण, आता लॉक डाऊनमुळं या बंदीमध्ये वाढ करण्यात आली असून, येत्या 14 एप्रिलपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय विमान भारतात प्रवेश करणार नाही. त्यामुळं भारता बाहेर विदेशात अडकलेल्यांना 14 एप्रिलपर्यंत तेथेच थांबावे लागणार आहे. 

विमानसेवा बंद होण्यापूर्वीचा मुंबई-दिल्ली तिकिटदर माहिती आहे का?

दिल्ली मेट्रो बंदच 
देशात लॉक डाऊन जाहीर झाला असल्यामुळं दिल्लीती मेट्रोसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्युची घोषणा केली होती. त्यानंतर दिल्ली मेट्रो कार्पोरेशनने 31 मार्चपर्यंत मेट्रो सेवा बंद राहील, असे जाहीर केले होते. आता 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन जाहीर केल्यामुळं दिल्ली मेट्रो 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. कार्पोरेशनने याबाबत आज अधिकृत घोषणा केली. ॉ

आणखी वाचा - युरोपमध्ये या देशात बिघडली परिस्थिती; मृतांची संख्या चीनच्यापुढे

कम्युनिटीमध्ये कोरोना नाही 
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, या रुग्णांनी विदेशात प्रवास केला आहे किंवा विदेशात जाऊन आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात हे रुग्ण आले आहेत. देशात अजूनही स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली नाही. कम्युनिटी ट्रान्समिशनची कोणतिही मोठी घटना आढळलेली नाही, असं केंद्र आरोग्य खात्याचे सह सचिव लव अगरवाल यांनी म्हटलंय. अगरवाल म्हणाले, 'भारतात असेही काही रुग्ण आढळले आहे ज्यांचा विदेशात जाऊन आलेल्या व्यक्तींशी कोणताही संपर्क झालेली नाही. पण, असे रुग्ण खूपच किरकोळ असून, त्यांची सविस्तर माहिती घेतली जात आहे. त्यामुळं देशच कम्युनिटी ट्रान्समिशनच्या स्टेजला आहे, असं म्हणता येणार नाही.'

आणखी वाचा - पुण्यात संचारबंदी असतानाही ती पोहोचली सकाळ कार्यालयात

19 जण निगेटिव्ह
केरळमध्ये तिरुअनंतपुरमधील एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात 24 जण आले होते. त्यापैकी 19 जणा कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत. यात पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही समावेश आहे. संबंधित कोरोना पेशंट स्वतः डॉक्टर असून, एका प्रशिक्षणासाठी स्पेनला गेले होते. ट्रेनिंग संपवून ते 1 मार्च रोजी केरळमध्ये परतले. पण, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

बिहारी कामगारांसाठी 100 कोटी 
कामाच्या निमित्तानं इतर राज्यांमध्ये बिहारचे अनेक मजूर, कामगार अडकले आहेत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची आणि खाण्याची सोय नाही त्यामुळं बिहार सरकारनेच त्याबाबत पुढाकार घेतला असून, कामगारांच्या निवाऱ्यासाठी 100 कोटी रुपये जाहीर केले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या पॅकेजची घोषणा केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही रक्कम दिली जाणार आहे. पण, यानिधीचा वापर लॉक डाऊनमध्ये कसा होणार याविषयी प्रश्नचिन्ह आहे. त्यावर नितीशकुमार यांनी इतर राज्यांशी चर्चा करून काम करणार असल्याचे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus india update 649 patients international flights cancelled