esakal | Coronavirus : देशात आज कुठं काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-In-India

जगभरात कोरोनाचा फैलाव अतिशय वेगानं होत असताना, भारत अजूनही तिसऱ्या स्टेजमध्ये गेला नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलंय. भारतात आतापर्यंत एक हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून, 31 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रासह अनेक राज्ये मोठ्या मेहनतीने कोरानाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात तेलंगण राज्याने येत्या 9 दिवसांत राज्य कोरोनामुक्त करण्याचा दावा केलाय. वाचा दिवसभरात देशात कोठे काय घडले.

Coronavirus : देशात आज कुठं काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा फैलाव अतिशय वेगानं होत असताना, भारत अजूनही तिसऱ्या स्टेजमध्ये गेला नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलंय. भारतात आतापर्यंत एक हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून, 31 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रासह अनेक राज्ये मोठ्या मेहनतीने कोरानाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात तेलंगण राज्याने येत्या 9 दिवसांत राज्य कोरोनामुक्त करण्याचा दावा केलाय. वाचा दिवसभरात देशात कोठे काय घडले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्‍चिम बंगाल - दार्जिलिंग जिल्ह्यात महिलेचा मृत्यू
कोलकता -
 पश्‍चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात ४४ वर्षांच्या महिलेचा कोरोना व्हायरसमुळे सोमवारी मृत्यू झाला. राज्यात या विषाणूंमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. संबंधित महिलेची मुलगी चेन्नईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने महिला ७ मार्च रोजी चेन्नईला गेली होती. १९ मार्चला ती मुलीसह पश्‍चिम बंगालला विमानाने परतली होती. परत आल्यावर तिला श्‍वसनाचा तीव्र त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या रक्ताच्या नमुन्यांच्या चाचणीत कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. या महिलेच्या कुटुंबातील ११ सदस्य, तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला एकांतवासात राहण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. लष्करातील डॉक्टरसह अन्य एकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाल्याने राज्यातील बाधितांची संख्या २० झाली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात फवारणी केली जात असून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

बिहार - एकाच दिवसात चाळीस संशयित
पाटणा - कोरोनाव्हायरसची लागण झाल्याच्या संशयाने सोमवारी बिहारमधील वेगवेगळ्या विभागातील रुग्णालयांत ४० जणांना दाखल करण्यात आले आहे. 

रुग्णालयांत दाखल झालेल्या संशयित रुग्णांची एकूण संख्या १५१ झाली आहे. राज्य सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये सुमारे ८६९ नमुने तपासण्यासाठी ‘आरएमआरआय’ आणि ‘आयजीआयएमएस’मध्ये पाठविण्यात आले होते. त्यातील ८४० नमुने ‘निगेटिव्ह’ आले असून ११ जणांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

पाटण्यातील ‘आरएमआरआय’मध्ये आज सायंकाळी चारपर्यंत १३६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील एकाही नमुन्यात कोरोनाचा विषाणू आढळला नाही. 

बाधितांची संख्या १५
राज्यातील बाधितांची संख्या आत्तापर्यंत १५ झाली आहे, असे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

ओडिशा - ओडिशाचा अर्थसंकल्प मंजूर 
भुवनेश्‍वर -
 कोरोनाव्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन असताना ओडिशा विधिमंडळाने सोमवारी विनियोग विधेयक व २०२०-२१ चा वार्षिक अर्थसंकल्प मंजूर केला.अधिवेशनाचे कामकाज विधानसभेऐवजी लोकसेवा भवनमधील सभागृहात एक तास चालले. सत्ताधारी बिजू जनता दलाचे प्रवक्ते अमरप्रसाद सत्पथी म्हणाले की राज्याचे अर्थ मंत्री निरंजन पुजारी यांनी दीड लाख कोटी रुपयांचे विनियोग विधेयक मांडले. ते एकमताने मंजूर करण्यात आले. कोरोनाव्हायरसमुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’सारखे उपाय करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष सूर्जा नारायण पात्रो यांनी दिल्याने एक तृतीयांशी सदस्य अधिवेशनासाठी उपस्थित होते.

ओडिशातील एक लाख जण अडकले
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील सुमारे एक लाख नागरिक देशाच्या विविध भागांमध्ये अडकून पडले असल्याची माहिती राज्य सरकारकडून आज देण्यात आली. 

उत्तर प्रदेश - ‘यूपी’त कामगारांच्या खात्यात ६११ कोटी 
लखनौ -
 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मनरेगा योजनेखाली २७. ५ लाख कामगारांच्या बँक खात्यांत ६११ कोटी रुपये सोमवारी थेट जमा केले आहेत. योगींनी कामगारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी संवाद साधून योजनेची माहितीही दिली. विविध राज्यांमध्ये नेमणूक केलेल्या उत्तर प्रदेशमधील १२ स्थानिक अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी उत्तर  काल बैठक घेतली. लॉकडाऊनच्या २१ दिवसांमध्ये कोणीही उपाशी झोपू नये, याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. उत्तर प्रदेशमधील जे लोक अन्य राज्यात आहेत, त्यांच्यासाठी अन्न व राहण्याची सोय करण्याचे निर्देशही  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 

लॉकडाऊन म्हणजे ती किंवा तो जेथे आहे, तेथेच राहणे. असे करणे प्रत्येकाच्याच हिताचे आहे. सुरक्षित आरोग्यासाठी हे आवश्‍यक आहे.
- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

तमिळनाडू - रुग्णांच्या नातेवाइकांचा पिच्छा पुरवू नका 
चेन्नई-
 कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळावी म्हणून त्यांचा पिच्छा पुरवू नये, असे आरोग्य खात्याच्या एका महिला अधिकाऱ्याने माध्यमांच्या प्रतिनिधींना सोमवारी बजावले. तमिळनाडूतील रुग्णांची संख्या वाढत असताना पत्रकार सक्रिय झाले आहेत. माहितीसाठी रुग्णवाहिकांचा पाठलाग केला जात असल्याचे दिसून आले. याबद्दल या अधिकारी म्हणाल्या की, माध्यमांनी वार्तांकन करताना नियमन करावे. रुग्ण किंवा नातेवाइकांचा माहितीसाठी पिच्छा पुरविणे वैद्यकीय व्यवसायाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. कोरोनाबाबतची माहिती सरकार पुरवीत आहेत. यानंतरही आणखी तपशील मिळावा, रुग्ण कसा आजारी पडला, त्याला कसे वाटत आहे, त्याच्या कुटुंबातील इतरांची प्रकृती कशी आहे, अशी माहिती घेण्यासाठी दूरध्वनी क्रमांक मिळवून तपशील विचारला जात आहे. असे सातत्याने होऊ लागले तर नातेवाइकांवर प्रचंड दडपण येऊ शकते. आम्हाला एका व्यक्तीच्या पत्नीने दूरध्वनी केला. त्यावेळी ती रडत होती, असेही त्यांनी सांगितले. 

केरळ - डॉक्टरांनी चिठ्ठी दिल्यास मद्य द्या - विजयन
तिरुअनंतपुरम -
 केरळमध्ये डॉक्टरांची चिठ्ठी असलेल्यांना मद्य पुरविण्याचा आदेश मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी महसूल विभागाला सोमवारी दिला. लॉकडाऊनमुळे केरळमध्ये दारु विक्री बंद असल्याने मद्यपींच्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिनराई विजयन यांना आज ही घोषणा करणे भाग पडले.

दारुच्या टंचाईमुळे सामाजिक समस्या निर्माण होऊ लागल्याने दारुची ऑनलाइन विक्री करण्याच्या पर्यायावरही राज्य सरकार विचार करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केरळमधील त्रिसुर जिल्ह्यात दारु न मिळाल्याने सैरभैर झालेल्या एका युवकाने शनिवारी (ता. २८) नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, ‘दारु न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या मद्यपींना अल्कोहोल देण्याची शिफारस करणे म्हणजे उपचाराचा अधिकार हिरावून घेण्यासारखे आहे,’ असे स्पष्ट करीत भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) केरळच्या विभागाने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या आदेशावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. 

तेलंगण - ...तर राज्य कोरोनामुक्त
हैदराबाद -
 येत्या नऊ दिवसात तेलंगण राज्य कोरोनमुक्त होईल असा दावा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दावा केला आहे. तसेच तेलंगणातील अनेक गावांनी स्वत:ला विलग ठेवण्याचा प्रयत्न केला असून या कृतीचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले आहे.  तेलंगणात गेल्या काही दिवसात ७० संशयित रुग्ण आढळून आले. त्यांची चाचणी केली असता ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

तर ५८ जणांवर उपचार सुरू आहेत. परदेशातून आलेल्या २५ हजार ९३७ जणांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यांना विलग ठेवण्याचा कार्यकाळ ७ एप्रिल रोजी संपणार असून नव्याने कोणतेही प्रकरण आले नाही तर राज्य  ७ एप्रिलपर्यंत कोरोनामुक्त होईल, असे  मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले. कोविड -१९ साठी डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय पदवीधरांचा एक गट तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यासाठी आणि नागरिकांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीचे स्वागत आहे. कोरोनावरुन अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

loading image