esakal | क्वारंटाइन कक्षातच सामूहिक नमाज पठण; पाहा कोठे काय घडले!
sakal

बोलून बातमी शोधा

Namaj-Pathan

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी एकत्र येऊ नये, असं आवाहन सातत्यानं केलं जात असलं तरी, काही ठिकाणी नियम आदेश अक्षरशः धुडकावून लावले जात आहेत. दुसरीकडं आरोग्य तपासणी करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या, त्यांच्यावर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशात इंदौरमध्ये तात पत्ती बखाल परिसरात स्थानिकांनी वैद्यकीय पथकावर दगडफेक केली. त्यात दोन महिला डॉक्टर जखमी झाल्या आहेत. दुसरीकडं बेंगळुरूमध्ये आशा वर्कर्सना धक्काबुक्की केल्याचा प्रकारही उघडकीस आलाय.

क्वारंटाइन कक्षातच सामूहिक नमाज पठण; पाहा कोठे काय घडले!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी एकत्र येऊ नये, असं आवाहन सातत्यानं केलं जात असलं तरी, काही ठिकाणी नियम आदेश अक्षरशः धुडकावून लावले जात आहेत. दुसरीकडं आरोग्य तपासणी करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या, त्यांच्यावर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशात इंदौरमध्ये तात पत्ती बखाल परिसरात स्थानिकांनी वैद्यकीय पथकावर दगडफेक केली. त्यात दोन महिला डॉक्टर जखमी झाल्या आहेत. दुसरीकडं बेंगळुरूमध्ये आशा वर्कर्सना धक्काबुक्की केल्याचा प्रकारही उघडकीस आलाय.

नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांची हेळसांड
उज्ज्वल कुमार

पाटणा - नेपाळमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांना भारतात परतता न आल्याने विरगंज येथील सीमावर्ती भागात ठेवण्यात आले असून भारतीय कामगारांच्या राहण्याची व्यवस्था नेपाळ सरकारने केली असून ४१६ कामगारांना केवळ एका वसतीगृहात ठेवण्यात आल्याने त्यांची हेळसांड होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नेपाळमध्ये काम करणारे भारतीय कामगार भारतात परतायला सुरुवात झाली. मात्र, देशात टाळेबंदी जाहीर झाली आणि नेपाळनेही आपल्या सीमा बंद केल्याने भारतीय कामगार सीमावर्ती भागातील विरगंज येथे अडकले आहेत. येथे अडकलेल्या कामगारांनी नेपाळ सरकारला विनंती करुनही त्यांनी भारतीयांना देश सोडण्यास मनाई केली. यावेळी नेपाळमधील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांनी येथे अडकलेल्या भारतीयांची खाण्याची व्यवस्था केली. मात्र, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेपाळ सरकारची होती. याविषयी बोलताना नेपाळ प्रशासनाने सांगितले, की अडकलेल्या भारतीयांची व्यवस्था सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांनुसार केली असून लवकरच त्यांची चांगली व्यवस्था करण्यात येणार आहे.

‘सरकारी सेवेविरोधात तक्रार हा नियमभंग’
जावेद मात्झी

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना व अन्य कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षेचे साहित्य मिळत नसल्याची तक्रार करणे म्हणजे सेवा नियमांच्या विरोधात जाणे आहे, असे काश्‍मीर आरोग्य सेवा संचलनालयाने (डीएचएसके) गुरुवारी सुनावले. ़़''डीएचएसके’ने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांवर सरकारी कर्मचारी खुलेपणाने टीका करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे करणे नियमभंग आहे. काही मतभेद असतील तर सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याबाबत सोशल मीडिया, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांकडे न जाता संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यातून मार्ग काढायला हवा.

प्रसारमाध्यमांपर्यंत अशा गोष्टी पोचविणाऱ्यांविरोधात यापुढे व्यक्तीवर भारतीय दंड संहितेनुसार तो दंडनीय गुन्हा ठरेल, असे असे सांगण्यात आले आहे.

विदेशातून दोन आठवड्यांपूर्वी श्रीनगरला परतलेल्या ३२४ जणांना विलगीकरण कक्षांत ठेवले होते. १४ दिवसांची मुदत संपल्यावर त्यांना आज घरी सोडण्यात आले. यातील बहुतेक जण बांगलादेशातून परतले होते.

डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मद्य देण्यास स्थगिती
अजयकुमार

तिरुअनंतपुरम - डॉक्टरांची चिठ्ठी असेल तर त्या व्यक्तीला मद्य देण्याची परवानगी विक्रेत्यांना केरळ सरकारने दिली होती. मात्र केरळ उच्च न्यायालयाने या निर्णयाला गुरुवारी स्थगिती दिली. ही स्थगिती तीन आठवड्यापर्यंत लागू असेल. काँग्रेसचे खासदार टी. एन. प्रतापन, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि केरळ सरकार वैद्यकीय अधिकारी संघटनेने सरकारच्या या निर्णयावर आव्हान याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेताना  न्यायाधीश ए. के. जयशंकरन नंबियार आणि न्या. शाजी पी. चाली यांच्या खंडपीठाने स्थगितीचा हंगामी आदेश आज दिला.

 ‘दारु न मिळाल्याने सैरभैर होणाऱ्या मद्यपींना जास्त दारू देण्याचा सरकारचा हा एकतर्फी निर्णय अस्वस्थ करणारा आहे. हा निर्णय म्हणजे आणखी संकट ओढवून घेण्यासारखे आहे,’ असे मत न्या. नंबियार यांनी व्यक्त केले.. दारु न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या व्यक्तीला दारु देण्याच्या शिफारसीचे समर्थन केल्याची नोंद कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांमध्ये आढळत नाही, असेही न्या. नंबियार यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मद्य वाटप थांबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट केले.

विलगीकरण कक्षात सामूहिक नमाज पठण
आर. एच. विद्या

हैदराबाद - तेलंगणमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. अशा रुग्णांना हैदराबादमधील गांधी रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. रुग्णालयात जागेची अडचण असली तरी खाटांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले आहे. मात्र तरीही नमाजच्यानावाखाली हे रुग्ण एकत्र येत आहेत. मुस्‍लीम धर्मगुरू आणि मौलवी यांनीही डॉक्टरांचा सल्ला ऐकण्याचे आवाहन केले असले तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
शहरात संशयाचे वातावरण
नवी दिल्लीतील निमाजुद्दिन येथे झालेल्या ‘तबलिगी जमात’च्या कार्यक्रमात हैदराबादमधून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यावरून जुन्या हैदराबादमधील वेगवेगळ्या भागात खळबळ उडाली आहे. प्रत्येक जण दुसऱ्यावर संशयित नजरेने पाहत आहे. शहरातील चंद्रायनगुट्टा, शाहीनगर आणि टोली चौकी भागातील पोलिसही दक्ष झाले आहेत. कोरोनाच्या संशयित रुग्णांची माहिती मिळाली की ते त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत आहेत.

ओडिशात कोरोनासाठी दोन विशेष रुग्णालये
स्मृती सागरिका कानुनगो

भुवनेश्‍वर - कोरोनाव्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेऊन ओडिशा सरकारने एका आठवड्याच्या कालावधीत दोन सुसज्ज रुग्णालये तयार केली आहेत. कोरोनासाठी खास उभारलेली ही देशातील पहिली आरोग्य केंद्रे ठरली आहेत. भुवनेश्‍वरमधील ‘केआयआयएमएस’ आणि कटकमधील अश्‍विनी रुग्णालयाचे उद्घाटन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज केले.

‘केआयआयएमएस’ येथील रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची आहे तर अश्‍विनी रुग्णालयाची क्षमता १२५ खाटांची आहे. ओडिशा खाण महामंडळाने या दोन्ही रुग्णालयांना निधी पुरविला असून व्यवस्थापन त्यांच्याकडेच आहे. या रुग्णालयांमधील रुग्णांवरील उपचार व त्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय मोफत करणार असल्याचे राज्य सरकारने यापूर्वीच सांगितले होते. 

नऊ जणांना अटक
कोरोनाव्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन असताना आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे बंधन असताना गंजम जिल्ह्यात ‘दंडा नाच’ या धार्मिक लोकनृत्याची तयारी बुधवारी (ता.१) रात्री करीत असलेल्या नऊ जणांना अटक केली.

loading image
go to top