कोरोनाच देशात दुसरा बळी; दिल्लीत महिलेचा मृत्यू

पीटीआय
शुक्रवार, 13 मार्च 2020

देशभरात

  • देशातील ११ राज्यांत सिनेमागृहे, पब, जलतरण तलाव, जिम बंद
  • ‘यूपी’त सार्वजनिक कार्यक्रम रद्द
  • केरळ, ओडिशात विधिमंडळ कामकाज तहकूब
  • बिहारमध्ये शैक्षणिक संस्था बंद
  • दिल्लीत शाळा, महाविद्यालये बंद
  • तमिळनाडूत शाळांना सुटी
  • पंतप्रधान मोदींचा गुजरात दौरा रद्द
  • आयआयटी कानपूरमधील लेक्चर्स २९ मार्चपर्यंत बंद
  • विद्यार्थ्यांनी वसतिगृहे रिकामी करावी : आयआयटी दिल्ली

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा देशातील दुसरा बळी आज दिल्लीत गेला. विषाणूच्या संसर्गामुळे ६८ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच जपान, स्वित्झर्लंड आणि इटलीला जाऊन आला होता. त्याच्याकडून कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण त्या महिलेमध्ये झाले होते. विशेष म्हणजे घरातील इतर कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या महिलेवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या महिलेला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. यापूर्वी गुरुवारी कर्नाटकातील कलबुर्गी येथील ७६ वर्षीय ज्येष्ठाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फोफावू लागल्याने आता केंद्राप्रमाणेच विविध राज्यांनीही टाळेबंदीचा मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा पहिला बळी गेलेल्या कर्नाटक सरकारने आज राज्यातील मॉल्स, सिनेमागृहे, पब्ज आणि नाइट क्लब आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, हरियाना, ओडिशा, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांनीही शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेत सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. केरळमध्ये विधिमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले असून, राज्यातील नऊशे जणांना विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे.

लढा कोरोनाशी : पिंपरी-चिंचवडमध्ये पालिकेचा मोठा निर्णय; रजा, सुट्या रद्द

कोरोनाग्रस्त इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आज ४४ भारतीयांचा दुसरा जत्था मायदेशी परतल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. दुसरीकडे देशातील विषाणूबाधितांची संख्या ८१ वर पोचली आहे. इटलीमधून मायदेशी परतलेल्या एका नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याला लष्कराच्या मानेसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध उपाययोजनांची घोषणा केली. राज्यातील शैक्षणिक संस्था आणि शाळा २२ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या असून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जम्मू- काश्‍मीरमध्येही सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद करण्यात आले असून, वॉटर पार्क आणि अंगणवाड्यादेखील ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. राजधानी दिल्लीमध्ये खासगी शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद केली ठेवली जाणार असून, सिनेमागृहे महिनाभरासाठी बंद ठेवण्यात येतील. पंजाबमध्ये भारत- पाकिस्तान दरम्यानच्या अटारी- वाघा सीमेवरून कोणत्याही परदेशी नागरिकास आता देशात सोडले जाणार नसून, पाकमधील भारतीयांनाही त्यांच्या व्हिसाची मुदत संपण्यापूर्वीच मायदेशी परतावे लागले.

मास्क, सॅनिटायझर यांना अत्यावश्‍यक वस्तूंचा दर्जा
मास्क आणि सॅनिटायझर यांचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने या दोन्ही घटकांचा अत्यावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. सध्या देशभर संसर्गाच्या भीतीने मास्क आणि सॅनिटायझर यांच्या खरेदीसाठी लोकांची धावाधाव सुरू असून काही भागांमध्ये यांचा काळाबाजार देखील सुरू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus india updates second patient death women delhi hospital