ही तर भारताची एकजूट; पंतप्रधान मोदींच्या आवाहनास देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद 

टीम ई-सकाळ
Sunday, 5 April 2020

शहरांप्रमाणेच गावांमध्येही लोकांनी उत्स्फूर्तपणे घरामध्ये दिवा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले,

नवी दिल्ली Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईचा निर्धार अधिक बुलंद करताना आज समस्त देशवासीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांसाठी दिवे लावले. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत प्रत्येकाने आपआपली घराची दारे, बाल्कन्यांमध्ये दिवे लावल्याने इमारती, घरे प्रकाशात उजळून निघाली होती. यानिमित्ताने राष्ट्रव्यापी शिस्तीचे दर्शन घडले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरांप्रमाणेच गावांमध्येही लोकांनी उत्स्फूर्तपणे घरामध्ये दिवा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले, ज्यांना घरामध्ये दिवे लावणे शक्य नव्हते त्यांनी मोबाईलचा फ्लॅश सुरू करून मोदींच्या आवाहनास प्रतिसाद दिला. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू संपुष्टात आल्यानंतर काही उत्साही मंडळींनी रस्त्यांवर उतरून जल्लोष केला होता, त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवताना तारेवरची कसरत करावी लागली होती. या खेपेस मात्र लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवत आपआपल्या घरातच दिवा लावला.

आणखी वाचा - देशात 52 टक्के नोकऱ्या धोक्यात 

दरम्यान, पंतप्रधानांनी आजच्या दिवशी घरातील दिवे बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. अनेकांनी विद्युत वितरणाचे मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडून नॅशनल ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, अशी भीतीही वर्तविली होती पण विरोधकांची ही भीती अनाठायी ठरली. लोकांनी घरातील विजेचे दिवे बंद केल्यानंतर देखील सर्वच राज्ये, शहरांतील वीज पुरवठा सुरळीत सुरू होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus indian people lighted diya candle pm narendra modi