Corona Updates: देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाचा कहर; महाराष्ट्रातील आकडे दिलासादायक!

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 18 August 2020

उत्तर आणि ईशान्य भारतातील राज्यातील रुग्णांची संख्या  2.6 पटीने वाढली आहे.

सध्या कोरोना रुग्णांची जी लाट देशभर पसरत आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्ये आघाडीवर होती. या राज्यांमध्ये दररोज नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक असून मृतांचा आकडाही वाढत असल्याचे चित्र समोर आले होते. पण आता उत्तर आणि ईशान्य भारतातील सहा राज्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाची लागण भारतात मार्च महिन्यात सुरू झाल्यावर इतर भारतातील राज्यांतून स्थलांतरित कामगार मोठ्या प्रमाणात माघारी घरी ( सहा राज्यात) आले होते. 

आरोग्य विभागाच्या 17 हजार जागा भरणार ; ओरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मागील 23 दिवसांतील (24 जूलै - 16 ऑगस्ट) भारतातील कोरोना रुग्णांचा आलेख पाहिला असता, भारतातील रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे. यात उत्तर आणि ईशान्य भारतातील राज्यातील रुग्णांची संख्या  2.6 पटीने वाढली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचा यात सामावेश आहे. सुरुवातीला या राज्यांमध्ये असलेल्या अपुऱ्या टेस्टींगमुळे रुग्णांचे प्रमाण वाढले होते. पण आता या आकड्यांनी चांगलाच जोर धरला आहे.  उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी 24 जुलै पासून आतापर्यंत अनुक्रमे 2.5, 3.1, 3.1, 2.6, 2.2, 2.6 पटीने वाढली आहे.

कोरोनाची लस पहिल्यांदा कोणाला देणार?

मागील 24 तासांत देशातून एक कोरोनाबद्दलची दिलासादायक बातमीही आली आहे. काल एका दिवसात कोरोनाचे 53,230 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी हा आकडा 60-65 हजारांच्या घरात होता. तसेच मागील आठवड्यातील एक अपवाद वगळता कोरोनाचे दररोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. यामूळे काल वाढलेले रुग्ण तुलनेत कमी आहेत.  तसेच देशात कोरोनामुळे एका दिवसातील मृत्यू दरातही काही प्रमाणात घट झाली आहे. मागील 24 तासांत 902 नव्या रुग्णांची भर पडली. मागील 6 दिवसांपासून हा आकडा 900 च्या वरच राहिला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे 26,98,877 रुग्ण झाले असून 19.7 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात कोरोनाचे 6,74,650 सक्रिय रुग्ण आहेत.  

महाराष्ट्रातूनही कोरोनाबद्दल सकारात्मक बातमी आहे. काल एका दिवसात महाराष्ट्रात 8,493 नवीन रुग्ण आढळले आहेत. मागील 13 दिवसांतील ही सर्वात कमी वाढ आहे. नव्या आकडेवारीनंतर आता महाराष्ट्रातील कोरोना झालेल्या रुग्णांचा आकडा 6 लाखांच्या घरात पोहचला आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाने एका दिवसात होणारा मृत्यू दर कमी झाला आहे. काल एका दिवसात 228 रुग्ण दगावले असून मागील 21 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus news updates india and maharashtra Six north and east witness surge in Covid 19 cases