लॉकडाऊनकाळात पिझ्झा ऑर्डर करताय? जरा सावधान, ही बातमी वाचा!

टीम ई-सकाळ
Thursday, 16 April 2020

डिलीव्हरी बॉयला २० दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसत होती तसेच तो उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. 

Coroanvirus : दिल्लीतील एका पिझ्झा डिलिवरी बॉयला कोरोनाची लागण झाली असून आता दिल्लीत त्याने पिझ्झा दिलेल्या ७२ कुटूंबांना आता घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील मालवीय नगरमध्ये पिझ्झा डिलीव्हरी बॉय कोरोना असल्याचे आता समोर आले आहे. यानंतर ज्या कुटुंबात त्याने पिझ्झा डिलीव्हरी केली होती त्या सर्व कुटुंबांना दिल्ली सरकारने घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पिझ्झा डिलीव्हरी करणाऱ्या इतर १७  मुलांना देखील घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सतिंदर जैन यांनी सांगितले की, संबंधीत कंपनीविरुद्ध आता कडक कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वास्तविक, डिलीव्हरी बॉयला २० दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसत होती तसेच तो उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. २० दिवसांत त्याने ७२ घरांमध्ये पिझ्झा डिलीव्हर केला होता. आरोग्य मंत्री सतिंदर जैने यांनी म्हटले आहे की, डीलीव्हरी बॉयमध्ये कोरोनाची लक्षणे असूनही कंपनीने मुलांकडून काम करून घेतले. कंपनीच्या हलगर्जी पणामुळे आता इतर कुटुंबांनादेखील याचा धोका निर्माण झाला आहे.

दक्षिण दिल्लीचे जिल्हाधिकारी ब्रिजमोहन मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही डिलीव्हरी बॉयला उपचारासाठी पाठवून दिले आहे. तसेच त्यांनी ज्या ७२ घरांमध्ये डिलीव्हरी दिली होती, त्या घरातील व्यक्तींना होम क्वारंटाईन करून घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रशासनाने पिझ्झ्याचे ते दुकान देखील बंद केले असून आउटलेटमधील सर्व डिलिव्हरी बॉय आणि कर्मचारी यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा - जग वाट पाहतंय कोरोनाच्या लसीची!

मिश्रा पुढे म्हणाले की, संसर्ग झालेल्या मुलाने सांगितले की त्यांनी डिलिव्हीरी करताना मास्कचा वापर करूनच डिलिव्हरी केली. तसेच सर्व सोसायटी आणि कॉलनीच्या गेटवर सॅनिटायझरने हात स्वच्छ केले होते. दरम्यान ७२ घरातील कोणत्याही व्यक्तीला सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणं आढळून आलेली नाहीत. तरी देखील खबरदारी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, मालवीय नगरमधील काही भाग सील देखील करण्यात आला आहे. एका अहवालानुसार हा डिलिव्हरी बॉय गेल्या आठवड्यापर्यंत ड्युटीवर होता आणि पिझ्झा डिलिवरी करत होता. हा पिझ्झा डिलिवरी बॉय गेल्या आठवड्यात डायलेसिस करिता एका रुग्णालयात गेला होता व त्या ठिकाणीच याला कोरोनाचे संक्रमण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा - काय चाललंय जगात? वाचा ब्लॉग

दिल्लीत सध्या दिलासादायक परिस्थिती
महाराष्ट्रानंतर दिल्ली हे कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झालेले राज्य आहे.  दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख खूप वेगाने उंचावत होता,  त्याला बुधवारी ब्रेक लागला. बुधवारी देशाच्या राजधानीत कोरोनाची केवळ १७  नवीन प्रकरणे समोर आली आहेत, ही संपूर्ण एप्रिलमध्ये कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे.  बुधवारी दिल्लीत कोरोनामुळे दोन मृत्यू झाले असून, आता मृतांचा आकडा ३२ पर्यंत पोहोचला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pizza delivery boy got positive delhi 72 families now quarantine