धक्कादायक : संचारबंदीचा पास विचारला; पोलिसाचा हातच कापला

टीम ई-सकाळ
Sunday, 12 April 2020

संतापलेल्या निहंग शिखांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यात एएसआय हरजित सिंग यांचा हातच कापला.

चंदिगड Coronavirus : एकीकडे कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी देश एकटवटलेला असताना पंजाबच्या पतियाळा येथे निहंग शिखांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रकार आज सकाळी घडला. या हल्ल्यात हल्लेखोरांनी एका पोलिस कर्मचाऱ्याचा हात तोडल्याचा धक्कादायक प्रकारही घडला. ही घटना पतियाळातील भाजी मंडईच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - पोलिस ठाण्यात कोरोनाची शिरकाव; अधिकारी रुग्णालयात दाखल

काय घडले?
पारंपारिक शस्त्रे बाळगणारे आणि निळ्या रंगाचा कुर्ता घालणाऱ्या शीख व्यक्तीस निहंग शिख म्हटले जाते. आज सकाळी पतियाळातील भाजी मंडईत पाच निहंग शिखांची गाडी पोचली. तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडविली आणि त्यांनी संचारबंदीच्या पासविषयी विचारणा केली.त्यावेळी संतापलेल्या निहंग शिखांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यात एएसआय हरजित सिंग यांचा हातच कापला. त्यांना तातडीने चंडीगडच्या पीजीआय रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात अनेक पोलिस कर्मचारी आणि भाजी मंडईचे पदाधिकारी देखील जखमी झाले. यासंदर्भात पतियाळाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनदिप सिंग सिद्धू म्हणाले, की त्यांना संचारबंदीचा पास मागितला होता. परंतु त्यांनी रागाच्या भरात गाडीने तेथील दरवाज्याला आणि अडथळ्यांना उडविले. त्यानंतर या लोकांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. हरजित सिंग यांचा तलवारीने हात कापला. तर पोलिस सदर ठाण्याचे प्रभारी कोहनी यांनाही गंभीर जखमी केले. अन्य एक पोलिस अधिकारी देखील या हल्ल्यात जखमी झाला. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच अतिरिक्त पोलिस महासंचालक राकेश चंद्र आणि कमांडोचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

आणखी वाचा - मुंबईतील सातारकरांनो घाबरू नका; कोरोनाविरुद्ध लढ्याला साथ द्या

कडक कारवाई करणार 
पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पोलिस कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध करत दुर्देवी घटना असल्याचे म्हटले आहे. दोषींना लवकरच अटक केली जाईल, असे ते म्हणाले. एसआय हरजित सिंग यांच्यावर चंडीगडच्या पीजीआयमध्ये उपचार सुरू असून, त्यांच्यावर प्लॅस्टिक सर्जरी सुरू केल्याचे ते म्हणाले. ते लवकरात लवकर बरे होवोत, अशी कामना त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus sikh man cuts police officers hand checkpost Punjab