व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

टीम ई-सकाळ
Monday, 13 April 2020

आज सोमवारच्या सकाळी आग्रा शहराच्या प्रसिद्ध रामबाग चौकातून एक दूधवाला दूध घेऊन जात असताना त्याची दुधाची किटली रस्त्यावर पडली. 

Coronavirus : सध्या सर्वत्र कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यात गरीब लोकांचे अतोनात हाल होत आहेत. अशातच ह्र्दय पिळवून टाकणारी घटना आग्रामध्ये घडली आहे. त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध पत्रकार कमाल खान यांनी ट्विटरवर शेयर केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनचा आजचा २० वा दिवस आहे. या लॉकडाऊन काळात ज्यांचे हातावर पोट आहे व जे रस्त्याच्या कडेला भिक मागून आपला रोजचा उदरनिर्वाह चालवतात त्यांचे अतोनात हाल होत आहेत. सरकारकडून गरीब कुटुंबाना रेशन व इतर अन्न धान्य पुरवठ्याची जरी घोषणा करण्यात आली असली तरी, त्या घोषणेचा समाजातील या घटकाला लाभ होताना दिसत नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, ज्याच्या डोक्यावर छतच नाही अशा लोकांचा विचार करण्यात आला नाही.

आणखी वाचा - वय ६२ वर्ष, तरीही रोज उन्हात पनवेल ते वडाळा प्रवास करून करतायत रुग्णसेवा

काय घडले आग्रामध्ये?
आज सोमवारच्या सकाळी आग्रा शहराच्या प्रसिद्ध रामबाग चौकातून एक दूधवाला दूध घेऊन जात असताना त्याची दुधाची किटली रस्त्यावर पडली व त्यामुळे संपूर्ण रस्ता दुधमय झाला होता. या घटनेच्या थोड्याच वेळानंतर या ठिकाणी एक अशी घटना घडली ज्याची आपण कधी कल्पनाच करू शकत नाही. एकीकडे एक गरीब व्यक्ती मडक्यात रस्त्यावर सांडलेले ते दूध भरत होता तर दुसऱ्या बाजूला तीन-चार भटकी कुत्री ते दूध पीत होते. या घटनेचा केवळ ६ सेकंदाचा व्हिडीओ एका प्रसिद्ध वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेयर केला आहे. या घटनेने कोरोनामुळे गरीब लोकांवर काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचे दाहक रूप पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा - उद्योजक, व्यवसायिकांसाठी मोठी बातमी

हजारो कोटींची मदत; गरिबांचे काय?
ज़रा मौसम तो बदला है मगर पेड़ों की शाख़ों पर नए पत्तों के आने में अभी कुछ दिन लगेंगे, बहुत से ज़र्द चेहरों पर ग़ुबार-ए-ग़म है कम बे-शक पर उन को मुस्कुराने में अभी कुछ दिन लगेंगे
- जावेद अख्तर.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या या शायरीप्रमाणेच भारताची सध्यास्थिती आहे. आपल्या देशातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजारो कोटींची मदत या कठीण काळात सरकारला केली आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी टाटा समूहाकडून १५०० कोटींची मदत केलीये तसेच, विप्रोचे अजीम प्रेमजी यांनी ११,५०० कोटींची मदत केली आहे. याप्रमाणे भारतातील सर्वच आघाडीचे उद्योजक आनंद महिंद्रा, अडाणी समूह, अंबानी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. तसेच प्रसिद्ध कलाकारांकडून सुद्धा अनेक प्रकारे मदत करण्यात येत आहे. परंतु देशातील त्या गरीब व्यक्तींपर्यंत ती मदत अजून पोहचू शकत नाहीये. सरकारकडून समाजातील प्रत्येक गरीब व्यक्ती पर्यंत मदत पोहोचण्यासाठी अजून किती वेळ वाट पाहावी लागेल असा प्रश्न या व्हिडीओतून आता स्पष्ट होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus viral video poor man collecting milk from road agra