Coronavirus : दिलासादायक! राजधानी दिल्लीत... 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

- गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत एकही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातील विविध राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत काही रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत मागील २४ तासांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. मात्र, डॉक्टरांनी नागरिकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे.

३० जणांना कोरोनाची लागण

दिल्लीत आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन दिवसात १६ रुग्णांची नोंद झाली. यातील ५ रुग्ण ठिक असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

उत्तर प्रदेशात लॉकडाऊन

उत्तर प्रदेशमधील १६ जिल्ह्यांत तीन दिवसांचा लॉकडाउन सोमवारपासून सुरू झाला. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात धाव घेतली. मात्र, विक्रेत्यांनी भाजीपाल्यासह अनेक वस्तूंचे भाव वाढविल्याच्या तक्रारी सध्या नागरिकांकडून केल्या जात आहेत.

अनेक ठिकाणी रस्त्यावर शुकशुकाट

देशातील अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट होता. नागरिकांनी घरात बसण्यालाच प्राधान्य दिल्याने रस्ते ओस पडले होते. अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि कर्मचारी वगळता इतर कोणीही रस्त्यावर दिसत नाही, अशी परिस्थिती सध्या आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Delhi no new cases of Coronavirus in 24 hours