Coronavirus : वृत्तपत्रांच्या वितरणात अडथळा चिंताजनक

वृत्तसंस्था
Sunday, 5 April 2020

कोरोनाविषाणूंविरुद्ध सारे जग एकत्र येऊन लढत आहे. अशावेळी विश्‍वासार्ह माहिती हे एक अस्त्रच ठरते आणि ते या लढ्यात आवश्‍यक ठरते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विश्‍वासार्ह माहिती मिळते. त्यामुळे वृत्तपत्रांचे वितरण सुरु राहणे आवश्‍यक ठरते. 
- हरीश साळवे, माजी सॉलिसिटर जनरल

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाची तीव्रता वाढत असताना विश्‍वासार्ह माहिती देणाऱ्या, सरकार तसेच प्रशासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक हातभार लावणाऱ्या वृत्तपत्रांच्या वितरणात अडथळा येणे चिंताजनक असल्याची एकमुखी प्रतिक्रिया देशातील ज्येष्ठ कायदेतज्ञांनी व्यक्त केली. वितरण हा वृत्तपत्रांचा घटनात्मक अधिकारी असल्याचा मुद्दाही ठसविण्यात आला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल महिंदर सिंग यांनी सांगितले की, वितरण हा वृत्तपत्रांचा घटनात्मक अधिकार असून तो अनुच्छेद १९ (१) अ, १९ (१) ग द्वारे सुरक्षित करण्यात आला आहे. मुळात गोदामात ठेवण्यासाठी कोणताही समूह वृत्तपत्रांची छपाई करीत नाही. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, वृत्तपत्र वितरणावर सरकारने कोणतेही निर्बंध घातले नाहीत, तसेच अत्यावश्‍यक सेवेत समावेश केला आहे. त्यामुळे कुणीही अडथळे वितरणात आणू नयेत.

वृत्तपत्रांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवा देखभाल कायद्यानुसार (इस्मा) वितरणात अडथळा हा गुन्हा ठरतो. आरोग्याच्या पातळीवर आणीबाणीसदृश परिस्थिती असताना नागरिकांना विश्वासार्ह माहितीपासून वंचित ठेवले जाणे निराशाजनक असल्याचे या तज्ञांनी सांगितले. माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी सांगितले की, सोशल मीडियामुळे अफवांचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात काम करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disturbance in newspaper distribution worries