डॉक्टरांच्या सल्ल्याविना ‘एचसीक्यू’चे सेवन नकोच

अजय बुवा
Sunday, 12 April 2020

आयसीएमआरचा इशारा 
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध कोरोनावरील उपचारासाठी परिणामकारक असल्याचे म्हटले आहे. परंतु, या औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज नको आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनही वापर नको, असे स्पष्ट करून याच्या दुष्परिणामांचाही इशारा दिला आहे.

नवी दिल्ली - हिवताप आणि सांधेदुखीवरील हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (एचसीक्यू) हे औषध कोरोनावर देखील उपकारक ठरत असल्याची बाब उघड झाल्यानंतर जगभरातील विविध देशांनी या औषधाच्या खरेदीला प्राधान्य दिले. दरम्यान या औषधाच्या उपयुक्ततेवरून वेगवेगळे युक्तिवाद पुढे येत आहेत. अमेरिकेची याचनावजा धमकी या औषधाचे महत्त्व अधोरेखित करणारी असली तरी त्याच्या वापराबद्दल खुद्द डॉक्टरांमध्येच मतभेद आहेत. वैद्यकीय सल्ल्याखेरीज या औषधाचा वापर होऊ नये याबाबत मात्र डॉक्टरांमध्ये मतैक्य दिसून येते. केंद्र सरकार देखील या औषधांच्या वापराबाबत आदेश काढण्याच्या विचारात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन बरेचसे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी या औषधाचा वापर करत असून इतरांनाही कोरोना प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी एचसीक्यू वापराचा सल्ला देत असल्याचे आढळून आले आहे. दहा दिवसांपर्यंत दररोज तीन गोळ्या घेण्यापासून ते सात आठवड्यांपर्यंत गोळ्या घेणे अशा वेगवेगळ्या शिफारशी डॉक्टरांकडून केल्या जात आहेत.

सरसकट सर्वांनीच एचसीक्यू घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे गंभीर दुष्परिणामांना निमंत्रण देणारे ठरेल. कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे औषध घ्यायला हवे. परंतु तेही शंभर टक्के परिणामकारक असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. 
- डॉ. अमोल अन्नदाते 

केवळ कोरोना प्रतिबंधासाठी एचसीक्यू घेणे नक्कीच फायदेशीर नाही. यकृतावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- डॉ. भरत जैन, मध्यप्रदेशातील वैद्यकीय संशोधक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not consume HCQ without doctors advice