डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी भेदभाव करू नका : मोदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 मार्च 2020

 कोरोनासारख्या जागतिक साथीच्या संकटकाळात कोरोनाग्रस्तांवर आपला जीव धोक्यात घालून उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी ही ईश्वराचीच रूपे आहेत.

नवी दिल्ली - कोरोनासारख्या जागतिक साथीच्या संकटकाळात कोरोनाग्रस्तांवर आपला जीव धोक्यात घालून उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी ही ईश्वराचीच रूपे आहेत. या सर्वांशी समाजातील कोणीही भेदभावाची वागणूक करू नये, अन्यथा कडक कारवाई होईल असा, इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. लॉकडाऊन च्या २१ दिवसांमध्ये ज्यांची अडचण होत आहे अशा हातावर पोट असलेल्या नऊ गरिबांना दररोज प्रत्येकाने मदत करावी असेही ते म्हणाले. काहीही करून २१ दिवस सामाजिक दुराव्याचे पथ्य पाळून कोरोनावर विजय मिळवू असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

मोदींनी आज आपला मतदारसंघ असलेल्या बनारसच्या निवडक नागरिकांशी संवाद साधून कोरोना च्या संदर्भात काही सूचना केल्या व विनाकारण घबराट न माजवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत शंका निरसनासाठी ९०१३१५१५१५ या व्हॉट्सअप नंबरवर आपल्या शंका विचारण्याचे देशवासियांना आवाहन केले. आपल्या सुमारे तासाभराच्या संवादाची सुरुवात आज सुरू झालेल्या चैत्र नवरात्रीच्या पर्वाने करताना मोदी म्हणाले की आजच्या पहिल्या दिवशी देवीची आराधना केली जाते. स्नेह करून आणि ममतेचे स्वरूप असलेली ही देवी निसर्गदेवता म्हणूनही ओळखली जाते. कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु आहे त्यात १३० देशवासियांना विजय मिळू दे अशी प्रार्थना करू या. महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले होते कोरोना विरुद्धच्या युद्धात २१ दिवसांत विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. १३० कोटी महारथींसह हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काशीनगरी ही समन्वय, संवेदनशीलता, सहयोग, शांती, सहनशीलता, साधना, सेवा, समर्पण याची शिकवण देते. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच सामाजिक दुरावा प्रभावी असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. कोरोना असे संकट आहे की ते, श्रीमंत देश असोत की गरीब, सुदृढ किंवा रुग्ण या कोणाशीही भेदभाव करत नाही असे सांगून मोदी म्हणाले की, या आजाराची भयानकता समजून घ्यावी आणि घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. 

सिगारेट गुटख्याच्या पाकिटावरील इशारे दुर्लक्षित करून ती व्यसने करणाऱ्यांचे उदाहरण देऊन मोदी म्हणाले की, अडचणी होणार नाहीत, पण झाल्याच तर त्या सहन करून कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकणे हे सर्वांचे ध्येय असले पाहिजे. २१ दिवस आम्ही घरात राहण्याची शिस्त पाळली नाही तर, आणखी किती काळ आपण संकटात लोटले जाऊ याची कल्पनाही करणे अशक्य आहे, असा इशारा मोदींनी दिला. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंधश्रद्धा पसरवू नका 
स्वतः स्वतःचे डॉक्टर बनवू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. आपला जीव धोक्यात घालून उपचार करणारे डॉक्टर नर्स वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण देशातील सर्व पोलिस महासंचालकांच्या बैठकीत दिले आहेत असेही मोदींनी नमूद केले. २१ दिवसांच्या लोकडाऊननचा निर्णय हा वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा करूनच घेतलेला आहे आणि यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not discriminate against doctors, medical staff