Coronavirus : मुंबई, पुण्यासह ११ शहरांची स्थिती चिंताजनक

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 21 April 2020

संवेनशील जिल्हे 

  • मध्य प्रदेश - इंदूर 
  • महाराष्ट्र - मुंबई व पुणे
  • राजस्थान - जयपूर 
  • पश्चिम बंगाल - कोलकता, हावडा, पूर्व मेदिनीपुर, उत्तर २४ परगणा, दार्जिलिंग, कलिम्पोंग जलपायगुडी.

केंद्र चार राज्यांना विशेष मदत करणार
महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या चार राज्यांमधील संबंधित जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती असल्याने केंद्र सरकार राज्य सरकारांना विशेष मदत करेल आणि यातून बाहेर पडण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू ठेवेल. अतिरिक्त सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकांद्वारे अहवाल आल्यानंतर राज्यांना आणखी सूचनावली जारी करण्यात येईल.

नवी दिल्ली  - महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यांमधील मुंबई, पुणे आणि इंदूरसह देशातील किमान ११ महानगरे आणि जिल्ह्यांत कोरोना महासाथीचा फैलाव होण्याची शक्यता गृहित धरुन परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला. या राज्यांमध्ये केंद्रीय पथके दाखल झाली असून त्यांच्याकडून अहवाल घेतला जाणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, राजधानी दिल्लीमधील कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत जात असताना गृह मंत्रालयाच्या ताज्या यादीमध्ये दिल्लीचा समावेश करण्यात आलेला नाही, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळमध्ये लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणावर सूट देणे हे गंभीर आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे उल्लंघन आहे, असा ठपका ठेवत गृहमंत्रालयाने केरळ सरकारला गंभीर इशारा देणारे पत्र पाठवले आहे. केरळने मात्र लॉकडाउनमधून मोठ्या  प्रमाणावर सूट दिल्याचा इन्कार करताना या मुद्द्यावर काहीतरी गैरसमज केंद्र सरकारचा झालेला आहे, असे म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या जिल्ह्यांच्या निवडीसाठी गृहमंत्रालयाने कोणते निकष लावले आणि तेथे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग नेमका कसा झाला, हे पत्रात स्पष्ट केलेले नाही असे नमूद केले.

गृह मंत्रालयातर्फे कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक असलेल्या राज्यांमधील परिस्थितीच्या पाहणीसाठी ६ अंतरमंत्रालयीन केंद्रीय पथके नियुक्त केली आहेत. ही पथके संबंधित राज्यांमध्ये परिस्थितीची पाहणी करतील आणि  त्याचा अहवाल केंद्राला पाठवतील असे स्पष्ट करण्यात आले.

केंद्रांच्या राज्यांना सूचना

  • सोशल डिस्टिन्सिंगचे काटेकोरपणे पालन करा
  • डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यावरील हल्ले रोखा
  • शहराकडे येणारी वाहने रस्त्यावरच थांबवा
  • लॉकडाउन मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eleven cities including Mumbai Pune are in critical condition