Coronavirus : वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट; 'या' राज्यातील भाजप सरकारने घेतला निर्णय

वृत्तसंस्था
Friday, 10 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय हरयाणा सरकारनं घेतला आहे.

चंदिगढ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय हरयाणा सरकारनं घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. समाजात चांगली वागणूक मिळत नसल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचं वेतन दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता हरयाणातल्या वैद्यकीय आणि या क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्याना दुप्पट पगार मिळणार आहे.

सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई

पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांना दुप्पट वेतन मिळत राहणार आहे. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल डॉक्टर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरू, मेदांता मेडीसिटीचे संचालक डॉ. नरेश त्रेहन, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेससोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्यात आल्याची माहिती दिली.

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा इशारा

सध्या कर्तव्य बजावत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कित्येकदा डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे सरकारनं तत्काळ पॅकेज द्यावं, अशी विनंती एका महिला डॉक्टरनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू असताना मुख्यमंत्र्यांकडे केली. यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी आरोग्य मंत्री अनिल विज आणि विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून वैद्यकीय आणि या क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करत असल्याची घोषणा केली. याचा लाभ कोरोनाशी लढणारे डॉक्टर, नर्स, चतुर्थ श्रेणी कामगार, रुग्णवाहिका चालकांना मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana government to pay double salary to govt doctors nurses