Coronavirus : अन् ऊसतोड मजुरांना अवघ्या तासाभरात मिळाली मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 9 April 2020

लालगुडी तालुक्यात अडकलेल्या गंगाखेडच्या उसतोडणी मजुरांची समस्या कळल्यानंतर मदतीसाठी तिरुचिरापल्ली जिल्हाप्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भाषेच्या अडचणीमुळे नेमकी माहिती समजावून सांगता येत नव्हती. तमिळनाडूतील सचिव आनंद पाटील यांच्या कानावर विषय घातल्यानंतर मदत कार्य वेगाने झाले. 
- अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी, परभणी

तमिळनाडूतील मराठी अधिकाऱ्यांमुळे कष्टकऱ्यांना मिळाला आधार
नवी दिल्ली - पोटाची खळगी भरण्यासाठी थेट तमिळनाडूतील तिरुचिरापल्लीमध्ये गेलेल्या  मराठवाड्यातील ऊसतोडणी मजुरांचे कोरोनाच्या संचारबंदीमुळे आणि भाषेच्या अडचणीमुळे चांगलेच हाल झाले होते. परंतु, तमिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकाऱ्यांच्या तत्परतेने या मजुरांना अवघ्या तासाभरात अन्नधान्याची मदत मिळाली. परभणीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी  यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऊसतोडणी मजुरांच्या टोळीचे मुकादम अंकुश आडे ६० मजुरांसमवेत कोठारी साखर कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील लालगुडी तालुक्यात आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर या मजुरांची अडचण सुरू झाली. कारखान्याकडून सुरवातीचे पाचच दिवस मदत मिळाली. नंतर जवळचा शिधाही संपायला आला होता. त्यात भाषेची अडचण असल्याने अन्न कोठून मिळवावे हा प्रश्न होता. मुकादम आडेंनी परभणीत संपर्क साधला. हा विषय परभणीतील जिल्हा मदत केंद्रापर्यंत आणि परभणीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तमिळनाडूमध्ये अडकलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी हालचाल सुरू झाली. 

ही मदत पोहोचविण्यात तमिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकारी आनंद पाटील हे महत्वाचा दुवा ठरले. आनंद पाटील यांनी ही माहिती तमिळनाडूतील आणखी एक मराठी अधिकारी अन्न व नागरी पुरवठा प्रशासनाचे आयुक्त सज्जन चव्हाण यांना दिली. आयुक्त चव्हाण यांनीही प्रशासकीय यंत्रणेचे चक्र वेगाने फिरवून लालगुडीच्या तहसीलदारांना या मजुरांपर्यंत धान्य पोहोचविण्याचे आदेश दिले. या आदेशापाठोपाठ लालगुडीच्या तहसीलदारांनी अवघ्या एका तासात स्वतः जाऊन या साठ मजुरांना १०० किलो तांदूळ, २५ किलो गहू आणि पाच किलो तूर डाळ असा धान्यसाठा दिला आणि या ऊसतोडणी मजुरांच्या पोटात अन्नाचा घास पडला. 

महाराष्ट्रातील साखर कारखाने केवळ ४५ दिवस चालले. त्यामुळे राज्यात काम नसल्याने कामासाठी ऊस तोडणी मजूर तमिळनाडूपर्यंत पोहोचले. या साठ जणांव्यतिरिक्त बीड, परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील गंगाखेड, परळी, जिंतूर या आणखी २५० ते ३०० ऊस तोडणी मजूर (१३ ते १४ टोळ्या) तमिळनाडूमध्ये आहेत. याच भागात आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.

परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगून लालगुडीच्या तहसीलदारांना तेथे पाठवले. ज्याप्रमाणे तिरुचिरापल्लीत मराठवाड्यातील ऊसतोड मजूर आहेत, तसेच कोईम्बतूर जिल्ह्यातही बिहारी मजूर आहेत. त्यांनाही प्रशासनातर्फे मदत केली जात आहे. बाहेरील राज्यातील लोकांना भाषेची अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मदत केंद्रामध्ये हिंदी येणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जाणीवपूर्वक नेमणूक करण्यात आली आहे. 
- सज्जन चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा आयुक्त, तमिळनाडू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help of the sugarcane cutting laborers in just one hour