Coronavirus : दिल्लीतील मराठीजनांकडून मदतीचा हात

मंगेश वैशंपायन
Sunday, 5 April 2020

कोरोनानिधीलाही मदत 
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय समितीच्या वतीने मिंटो रस्त्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसरात गरिबांना अन्न वाटपाचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे समितीने पंतप्रधानांच्या कोरोनानिधीला पाच लाख रुपयांची मदतही दिली आहे, असे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कर्नल मोहन काकतीकर यांनी सांगितले. मात्र समितीकडे अजूनही मनुष्यबळाची चणचण आहे. कारण लाॅकडाऊनच्या काळात काम करण्यासाठी कामगार येत नाहीत, असे त्यांनी सांगितले. मराठा मित्र मंडळाच्या चौगुले पब्लिक स्कूलचे सर्व व्यवहार बंद असल्यानेही मदतीला मर्यादा येतात असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसच्या संकटकाळात देशभरात लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनमुळे दिल्लीत स्पर्धा परीक्षा किंवा इतर अभ्यासासाठी आलेले हजारो विद्यार्थी आणि महाराष्ट्रातून आलेल्या कष्टकरी गोरगरिबांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या संस्था आणि अनेक मराठीजन पुढे आले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली मराठी प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी राष्ट्रीय समिती, बृहन्महाराष्ट्र मंडळ त्याचप्रमाणे मराठा मित्र मंडळ आदी संस्थांच्या माध्यमातून या मराठी मुलांना आणि गरिबांना मदत केली जात आहे. दिल्ली व परिसरात अनेक मराठी गरीब कुटुंबे राहतात. यातील कोणी रोजंदारीवर काम करतात, कोणी रिक्षा चालवतात. गोकुळपुरी भागातील सुमारे १५- १६ कुटुंबीयांची लॉकडाउननंतर पोटापाण्याची आबाळ होऊ लागली. हे समजताच दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी यमुनानगरचे स्थानिक आमदार अजय महावर यांच्याशी संपर्क केला. महावर यांनी त्याच दिवशी मराठी कुटुंबांना बोलावून प्रत्येकी पाच किलो गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साबण, टूथपेस्ट यांचे  दिले.

त्याचबरोबर लॉकडाऊनचे कटाक्षाने पालन करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना सहाय्यभूत भूमिका घ्यावी अशी विनंती आमदार महावर यांनी उपस्थितांना केली. दुसरीकडे अनेक गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांनीही गरिबांसाठी अन्नदान व मदतीची सामग्री देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र आता पोलिस अधिकाऱ्यांकडूनच अनेकवेळा, इतक्यात मदत पाठवू नका आमच्याकडे पुरेशी मदत आहे असे सांगितले जाते असाही अनुभव डांगे यांनी नमूद केला.

दिल्लीत मुख्यतः अभ्यासासाठी आलेल्या मराठी विद्यार्थ्यांना एक एप्रिलनंतर त्यांच्या त्यांच्या भागातल्या घरमालकांनी खोल्यांचे भाडे त्वरित देण्याचा तगादा लावला आहे. त्यांच्यासाठी गावाकडून ऑनलाईन किंवा बॅंकेत जाऊन पैसे पाठवणे अनेक पालकांनाही कठीण झाले आहे. दिल्लीतील राजेंद्रनगर, पटेलनगर, करोल बाग या भागात हजारो मराठी विद्यार्थी केंद्राच्या तसेच राज्याच्या स्पर्धा परीक्षा म्हणजेच यूपीएससी-एमपीएससी त्याचप्रमाणे इतर परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खोल्या घेऊन राहत असतात. स्वयंपाक करण्याची व्यवस्था नसल्याने लॉकडाउनची अकस्मात घोषणा झाल्यानंतर यातील अनेकांच्या खानावळी बंद झाल्या आणि त्यांनी त्यांच्या खोलीत स्वयंपाक करण्याची तयारी नसल्याने त्यांची मोठी अडचण होऊ लागली.

ज्यांच्याकडे स्वयंपाकाची सोय आहे, त्या अनेकांनी आसपासच्या मराठी मुलांना बोलावून घेतले, असे सुनील बनकर यांनी सांगितले. त्यालाही अनेक घर मालकांनी  विरोध केला. या काळात राजेंद्रनगर भागातील कृषी विभाग व्यावसायिक विशाल रावत यांनी अनेक मराठी मुलांना मदत केली. जी मुले आपल्याशी संपर्क साधतात किंवा प्रत्यक्ष भेटायला येतात. त्यांना आपण शक्य ती सारी मदत करतो, असे रावत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A helping hand from the Marathi people in Delhi