Coronavirus : जगाच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 30 April 2020

पंजाबमध्ये संचारबंदी वाढविली
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन संपण्यापूर्वी म्हणजे ३ मे पूर्वी अनेक राज्यांनी तो अंशतः किंवा पूर्णतः वाढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी आणखी दोन आठवड्यांसाठी संचारबंदी वाढविण्याची घोषणा आज केली. दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्येही हॉटस्पॉट भागांमधील लॉकडाउन तीन मे नंतर किमान २ आठवडे तरी चालू ठेवावा लागेल असे दिसते.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे जगातील सरासरी मृत्यूदर हा सात टक्‍क्‍यांच्या आसपास आहे तर भारताचा मृत्यूदर त्यापेक्षा बराच कमी म्हणजे ३ टक्के एवढा आहे , असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज सांगितले. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात आढळलेले १ हजार ८९७ नवे कोरोनाबाधित आणि मृत्युमुखी पडलेले ७३ रुग्ण, ही संख्या यंदा मार्चमध्ये या संसर्गाचा प्रकोप सुरू झाल्यापासूनची देशातील आतापर्यंतचा उच्चांक असल्याचे बोलले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हर्षवर्धन यांनी सांगितले की, ‘‘ देशात फक्त ०.३३% रुग्ण व्हेंटिलेटरवर,  १.५%  रुग्ण ऑक्सिजनवर  तर २.३४% टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. हे आकडे देशातील आरोग्य यंत्रणेच्या दर्जाचे  निदर्शक आहेत.’’

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ हजार ७८७ वर पोचली असून २२ हजार ८८२ एवढी सक्रिय रुग्णसंख्या आहे. मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १,००८ वर पोचला आहे. सकारात्मक बाब म्हणजे बरे झालेल्यांचा आकडा ही वाढत  असून तो ७ हजार ७९७ वर गेला आहे. मागील चोवीस तासांमध्ये एकूण रुग्णांमध्ये १५००, बरे झालेल्यांमध्ये ६६९ आणि मृत्युमुखी पडलेल्या मध्ये ७३ ने वाढ झाली आहे.

सीआरपीएफची तुकडी क्वारंटाईन
दिल्लीमध्ये नागरिक अजूनही लॉकडाउनचे पालन करत नसल्याची बाब समोर आल्यामुळे दिल्ली पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली आहे.  आजपासून दिल्लीतील आणखी तीन भाग सील करण्यात आले. दुसरीकडे कोरोनाचा विळखा सुरक्षा दलांना बसू लागला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफच्या ६०० जवानांच्या एका संपूर्ण तुकडीला आता विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. मयूर विहार भागात तैनात असलेल्या यातील ४५ जवानांपैकी आसामातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India has the lowest mortality rate in the world