Coronavirus : कोणतीही स्पेशल रेल्वे सोडणार नाही; मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
Wednesday, 15 April 2020

लॉकडाउन संपेर्यंत अर्थात ३ मे पर्यंत कुठलीही स्पेशल रेल्वे सोडण्याचे नियोजन नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाउन संपेर्यंत अर्थात ३ मे पर्यंत कुठलीही स्पेशल रेल्वे सोडण्याचे नियोजन नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात विविध शहरांमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याचा विचार रेल्वे विभागाकडून सुरु असल्याच्या बातम्या सोशल मिडीया आणि काही माध्यमांवर येत होत्या. या बातम्यांचे रेल्वे मंत्रालयाकडून खंडन करण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्रालायने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत म्हटले आहे की, देशभरात सर्व प्रकारची प्रवासी रेल्वे सेवा ३ मे पर्यंत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तसेच या दरम्यान विविध शहरांमधील स्थलांतरितांच्या झालेल्या गर्दीला त्यांच्या गावापर्यंत सोडण्यासाठी कोणत्याही विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचारही नाही. या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाने माध्यमांना आवाहन केले की, या स्पष्टीकरणाची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच या संदर्भात कोणतीही चुकीची बातमी येणार नाही याची काळजी घेऊन आमची मदत करावी.

नुकतेच आयआरसीटीसीनं म्हटलं होतं की, ३ मे पर्यंत रद्द झालेल्या ज्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग झाले आहे त्याचे पैसे प्रवाशांना पूर्णपणे परत करण्यात येतील. यासाठी प्रवासांना त्यांचे बुकिंगचे तिकीट रद्द करण्याची गरज नाही. तसेच ज्या प्रवाशांनी त्याचं तिकीट रद्द केलं आहे, त्यांनाही पूर्ण रिफंड देण्यात येईल. देशातील लॉकडाउन पुन्हा ३ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी केली. यावेळी काही माध्यमांनी परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार रेल्वेकडून सुरु असल्याचे वृत्त दिले होते. त्याचा परिणाम म्हणून काल (ता. १४) मंगळवारी मुंबईतील वांद्रे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार एकत्र आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Railways denies rumours of running special train services