वांद्रे प्रकरणी रेल्वेच्या भूमिकेची चौकशी करा; कॉंग्रेसची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 16 April 2020

रेल्वेच्या भूमिकेची चौकशी व्हावी आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशीही मागणी कांग्रेसने केली आहे

नवी दिल्ली - लॉकडाउनमध्ये मुंबईत परप्रांतिय मजुरांची गर्दी रस्त्यावर उतरल्यावरून आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणात रेल्वेच्या भूमिकेची चौकशी व्हावी आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशीही मागणी कांग्रेसने केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर परप्रांतीय मजुरांची गर्दी उसळल्यामुळे लॉकडाउन आणि सुरक्षित अंतर राखण्याच्या सर्व उपाययोजना कोलमडून पडली होती. यावर कांग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी रेल्वेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. लॉकडाउन सुरू असताना रेल्वेने तिकिटांची विक्री सुरू का ठेवली याची चौकशी होणे गरजेचे आहे. १५ एप्रिलपर्यंत रेल्वेने तिकिटांची विक्री केली. ज्यांनी तिकिट काढले होते ते स्थानकावर पोहोचले आणि सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागला. सरकार नेहमी गरीबांनाच का त्रास देते. या गरीबांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवावे, असे आवाहन प्रियांका यांनी ट्विटरवरून केले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी आज व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रसरकारवर असहकार्याचा आरोप केला. तसेच वांद्रे येथे मजूरांचा जमाव रस्त्यावर उतरण्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचाही ठपका ठेवला. केंद्र सरकारचा राज्यांशी एकतर्फी संवाद असल्यामुळे कोरोनाशी मुकाबल्यादरम्यान सुरु असलेल्या उपायोजनांमध्ये अनेक अडचणी येत असल्याचा दावा या मंत्रीद्वयांनी केला. लॉकडाउनमुळे लहान मोठे सर्व व्यवसाय ठप्प झाले असून बेरोजगारी वाढते आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्राने पुढाकार घेऊन राज्यांशी सल्लामसलत करून उपाय करण्याची गरज असताना एकतर्फी आर्थिक पॅकेज देणे आणि इतर घोषणा केल्या. मात्र या उपाययोजना तुटपुंज्या असल्याचेही टिकास्त्र अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी सोडले. 

आखातात भारतीय अडकले: राहुल  
दरम्यान, कॉग्रेस नेते राहुल गांधींनी आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय कामगारांना सरकारने मायदेशी सुरक्षित आणावे अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने विशेष विमानाद्वारे त्यांना भारतात आणून विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवावे, असेही राहुल यांनी ट्विट करून सुचविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigate the role of the railway in the Bandra case; Demand for Congress