Coronavirus : कोरोना म्हणजे नेमकं काय माहीत नाही? मग हे वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग...

 • राज्यात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले 
 • त्यानंतर यंत्रणा ठरल्याप्रमाणे कार्यान्वित 
 • कागदावरचे नियोजन प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ 
 • त्यानुसार धुरंधर योद्‌ध्याप्रमाणे डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची ‘पोझिशन’ 
 • ॲप्रन घातलेले योद्धे हे युद्ध सलग तीस दिवस लढताहेत 
 • न थकता व न कंटाळता स्वतःवर जोखीम घेऊन कर्तव्य

राज्यातील कोरोनाची बाधा झालेले पहिले दोन रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळल्यानंतर जेमतेम महिनाभरात ही संख्या एका हजाराच्या पुढे गेली. त्यानंतर जमावबंदीपासून सुरू झालेले कोरोना नियंत्रणाचे उपाय देशाच्या लॉकडाउनपर्यंत पोचले. हे केवळ एका पंधरवड्यातच घडले हे महत्त्वाचे. ते नेमके कसे घडले, त्याचा कोरोनाच्या संसर्गावर कसा परिणाम झाला आणि पुढे काय होणार, याविषयी...

का वाढतेय रुग्णसंख्या? 

राज्यात रुग्णसंख्या ही एका प्रमाणात वाढण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. गेल्या काही दिवसांपर्यंत एनआयव्ही याच एका प्रयोगशाळेकडून कोरोनाचे निदान करत होतो. त्यासाठी आवश्‍यक रोगनिदान किट परदेशातून आयात करण्यात येत होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती एवढ्यापुरतीच तपासणी मर्यादित होती. पण, आता नमुने संकलन केंद्र, तसेच निदान करणाऱ्या खासगी प्रयोगशाळांची संख्या २४ पर्यंत वाढली आहे. त्यात दहा खासगी तर १४ सरकारी प्रयोगशाळांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्याची व्यवस्था गेल्या पंधरा दिवसांमध्ये सुरू झाली. त्यातून रुग्णांची संख्या वाढताना दिसते.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असा असतो एक्‍सपोनेंशिअल ट्रेंड 

सांख्यिकी पद्धतीने साथीच्या उद्रेकाचे विश्‍लेषण करतानाचा हा दुसरा प्रकार आहे. लिनिअर ट्रेडमध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढते. पण, एक्‍सपोनेंशिअल ट्रेंडमध्ये गणितातील घातांकाप्रमाणे रुग्णांचे आकडे वेगाने वाढतात. त्यामुळे आलेख सुरुवातीच्या काही दिवसांपासूनच वर-वर जाण्यास सुरुवात होते. आदल्या दिवशीच्या तुलनेत प्रत्येक दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत दुप्पट-तिप्पट वाढल्याचे दिसते. त्याला एक्‍सपोनेंशिअल ट्रेंड किंवा घातांक पद्धतीने वाढणारी रुग्णसंख्या असे म्हणतात. सध्या अमेरिकेमध्ये अशा प्रकारे रुग्णांची संख्या वाढत आहे.

अकरा वर्षांनंतर नायडू रुग्णालय पुन्हा हादरले

देशात ९ मार्च रोजी सर्वत्र होळी साजरी होत होती. त्याच वेळी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालय अकरा वर्षांनंतर पुन्हा हादरले. दुबईला सहलीसाठी गेलेल्या दांपत्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केले. यापूर्वी २००९ मध्ये स्वाइन फ्लूच्या एच१एन१ या विषाणूचा उद्रेक पुण्यात झाला होता. रुग्णांना याच नायडू रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत विलगीकरण ठेवले होते. तीच परिस्थिती अकरा वर्षांनंतर रुग्णालयाची नवीन इमारत सध्या अनुभवत आहे. 

लिनिअर ट्रेंड म्हणजे काय?
रुग्णांची संख्या कशी वाढली, याचे विश्‍लेषण संख्याशास्त्रीय पद्धतीने केले जाते. ही संख्या दररोज सरासरी ३० ते ३५ ने वाढली आहे. त्यामुळे सोबतच्या आलेखात रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसते. त्याला लिनिअर ट्रेंड किंवा रेषीय कल असे म्हणतात. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे या आलेखावरून लक्षात येईल. ही संख्या २३ मार्चपर्यंत दोन आकड्यांमध्ये वाढत होती. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील काही दिवस ती तीन अंकांमध्ये नोंदली गेली. त्यामुळे आलेखाची ही रेषा एखाद्या रॉकेटप्रमाणे सरळ उंचावत गेलेली दिसत नाही. तर, विमानाप्रमाणे टेकऑफ होताना दिसते. जपानमध्ये रुग्णसंख्या अशी वाढल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

राज्यात लिनिअर ट्रेंड
राज्यात ९ मार्चला दोन रुग्णांपासून झालेली सुरुवात महिनाभरात हजारावर गेली. राज्यात दररोज रुग्ण आढळत आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असली तरीही ती वाढ जपानप्रमाणे लिनिअर ट्रेंडमध्ये आहे. अमेरिकेप्रमाणे एक्‍सपोनेंशिअल ट्रेंडमध्ये झालेली नाही, असा निष्कर्ष संसर्गजन्य रोग क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. उद्रेकाच्या पहिल्या पाच आठवड्यांचे विश्‍लेषण तज्ज्ञांनी केले आहे. त्यातून हा निष्कर्ष निघाला.

वाढत्या मृत्यूने वाढवली काळजी

 • देशात आतापर्यंत १६० बळी 
 • महाराष्ट्रातील ७२ रुग्ण बळी पडले.
 • ४० टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात
 • राज्यातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण सहा टक्के
 • हे प्रमाण राज्याची काळजी वाढविणारे आहे. 
 • ७२ पैकी ४० मृत्यू केवळ मुंबईमधील आहे. 
 • पुण्यात अठरा तर, ठाण्यात सात रुग्ण बळी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about Coronavirus