Coronavirus : ...आम्हाला मायदेशी परत येऊ द्या!

पीटीआय
Wednesday, 22 April 2020

माझी पत्नी अहमदाबादमध्ये असून, तिने दोन दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला आहे. माझ्या बाळाला मी पहिल्यांदा कधी पाहू शकेन याची मला कुठलीच कल्पना नाही. माझे नोकरीचा करार मागील महिन्यांतच संपला आहे. त्याबरोबर वैद्यकीय विम्याची मुदतही संपली आहे. अहमदाबादला परतण्यासाठी मी तिकिटे काढली होती, मात्र कोरोनाचे संकट आडवे आले आणि मी येथेच अडकून पडलो. 
- राहुल जोई, संशोधक विद्यार्थी, होक्काईडो विद्यापीठ, जपान

जपानमध्ये अडकून पडलेल्या २२० भारतीयांची कळकळीची विनंती
नवी दिल्ली - आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला भेटण्याची ओढ लागलेला संशोधक विद्यार्थी... बंगळुरात नव्या नोकरीवर रुजू होण्याच्या चिंतेत असलेल्या पदवीधर... अवघ्या चार दिवसांच्या कार्यालयीन दौऱ्यासाठी गेलेली गर्भवती... अशी सुमारे २२० भारतीय माणसे जपानमध्ये अडकून पडली आहेत. या सर्वांना मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. मात्र कोरोनाच्या संकटाचे ढग दिवसेंदिवस गडद होत असल्याने आपण भारतात कधी जाणार या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जपान सरकारने अनेक निर्बंध लादल्यामुळे त्या ठिकाणी अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्याकडील आर्थिक स्त्रोत अटत चालले असून, अनेकांच्या वैद्यकीय विम्याची मुदत ही संपली आहे. जपानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची संख्या २२० आहे. या सर्वांनी तेथील भारतीय दुतावासाशी संपर्क साधला असून, आपल्याला भारतात जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या सर्वांनी भारतीय दुतावासाला पत्र लिहिले आहे. मायदेशी परतल्यानंतर विलगिकरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करू असे आश्वासनही त्यांनी पत्राद्वारे दिले आहे.

प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करू, फक्त आम्हाला भारतात येऊ द्या अशी कळकळीची विनंती या सर्वांनी भारत सरकारकडे केली आहे. जपानमध्ये काही प्रमाणात लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची भिती तेथे अडकलेल्या भारतीयांच्या मनात आहे. अहमदाबाद येथील २८ वर्षांची एक गर्भवती टोकिओमध्ये अडकून पडली आहे. 'चार दिवसांच्या कार्यालयीन कामासाठी मी टोकिओला आले होते. माझ्या येथील राहण्याची व्यवस्था माझ्या कंपनीने केली आहे. मात्र येथून बाहेर पडून भारतात कधी येईन असे मला झाले आहे,'''' असे महिलेने पीटीआयशी बोलताना सांगितले.

मी चहा उद्योगात काम करतो. १८ मार्च रोजी मी कामानिमित्त जपानमध्ये आलो होते. जपानमध्येच अडकून पडलो असून, एका व्यावसायिक मित्राच्या लहानशा खोलीत सध्या राहतो आहे. माझे येथे राहणे दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहे. 
- कमल विजयवर्गीय, जयपूर येथील रहिवाशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let us return home indian people japan