Coronavirus : मुलासाठी माऊलीचा १४०० किमी स्कूटर प्रवास

पीटीआय
Saturday, 11 April 2020

मित्राला सोडण्यासाठी दुसऱ्या गावात गेलेल्या आणि लॉकडाउनमुळे तेथेच अडकलेल्या मुलाला घरी परत आणण्यासाठी स्कूटीवरून तीन दिवस सुमारे चौदाशे किलोमीटर प्रवास करण्याची मोहिम आंध्र प्रदेशमधील एका महिलेने यशस्वी केली.

हैदराबाद - मित्राला सोडण्यासाठी दुसऱ्या गावात गेलेल्या आणि लॉकडाउनमुळे तेथेच अडकलेल्या मुलाला घरी परत आणण्यासाठी स्कूटीवरून तीन दिवस सुमारे चौदाशे किलोमीटर प्रवास करण्याची मोहिम आंध्र प्रदेशमधील एका महिलेने यशस्वी केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रझिया बेगम असे त्यांचे नाव आहे. त्या निझामाबाद जिल्ह्यातील बोधन गावात सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. मुलाला आणण्यासाठी सोमवारी सकाळी घरातून निघून मंगळवारी दुपारी त्या तेथे पोहोचल्या आणि १७ वर्षीय मुलगा महंमद निझामुद्दीन याला घेऊन बुधवारी सायंकाळी परतल्या.

पोलिसांकडून रितसर लेखी परवानगी घेऊनच त्यांनी ही मोहिम सुरु केली. दोन राज्यांतील पोलिसांनी अनेक वेळा थांबवून विचारणा केली, पण लेखी पत्रामुळे पुढे जाण्यास परवानगी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

१२ वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी दोन अपत्ये लहानाची मोठी केली. त्यांना एक मुलगी आहे. निझामुद्दीन गेल्या वर्षी बारावी उत्तीर्ण झाला. तो वैद्यकीय प्रवेश परिक्षेची तयारी करीत आहे. मित्राच्या वडीलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तो त्याच्याबरोबर १२ मार्च रोजी नेल्लोरला गेला होता. काही दिवस तेथे राहिल्यानंतर तो लॉकडाउनमुळे अडकला. मुलाची काळजी वाटू लागल्याने रझिया त्याला परत आणण्याचा निश्चय करून सक्रीय झाल्या.

निर्मनुष्य रस्त्यांवरुन जाताना भिती न बाळगता केवळ मुलासाठी त्यांनी इतका लांबचा प्रवास केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother 1400 km scooter ride for son