esakal | उद्या ९ वाजता ९ मिनिटे दीप लावा - नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या ९ वाजता ९ मिनिटे दीप लावा - नरेंद्र मोदी

दिवे सुरू ठेवून मेणबत्ती लावा - राऊत
राज्यात नऊ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका आहे. जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती  लावावे असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा व आवश्यक तितके लाईट  चालू ठेऊन दिवे किंवा मेणबत्ती लावावी असे आवाहन डॉ. राऊत यांनी  केले आहे. सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सीवर जाऊ शकतात, अशा वेळी पॉवर स्टेशन बंद पडल्यास मल्टिस्टेट ग्रीड फेल्युअर नाकारता येत नाही, त्यामुळे लोकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन राऊत यांनी केले.

उद्या ९ वाजता ९ मिनिटे दीप लावा - नरेंद्र मोदी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - येत्या रविवारी म्हणजे ५ एप्रिलला रात्री ९ वाजता, ९ मिनिटांसाठी देशवासीयांना घरातील विजेचे सर्व दिवे बंद करून आपापल्या घरांच्या दरवाजात, बाल्कन्यांमध्ये उभे राहावे व दिवे, पणत्या, मोबाईलचे दिवे लावून कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढाईला बळ द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. देशभरातील नागरिकांना उद्देशून आज सकाळी नऊ वाजता केलेल्या भाषणात मोदींनी हा उपाय सांगितला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कोट्यवधी दिव्यांच्या प्रकाशात प्रत्येकाने हा कृतसंकल्प करावा की, या महासंकटकाळी आमच्यातील कोणीही एकटा नाही असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी, या अनोख्या दीपोत्सवात कोणीही रस्त्यावर येऊन गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार  २४ मार्चपासून २१ दिवसांसाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून कोट्यवधी नागरिक आपापल्या घरांतच थांबून आहेत. या काळात हातावर पोट असणाऱ्या गरिबांचे जे हाल होत आहेत त्याची  वेदनाही पंतप्रधानांनी यावेळी बोलून दाखविली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ढोल वाजविले गेले. आता दिवे लावायला सांगितल्यावर आग लावली नाही म्हणजे झाले.
- संजय राऊत, नेते शिवसेना

आताच प्रधान शोमॅनला ऐकले, लोकांचे दु:ख, त्यांचे ताणतणाव आणि आर्थिक उद्‌विग्नता कमी करण्याबाबत त्यांनी अवाक्षरही काढलेले नाही.
- शशी थरूर, नेते काँग्रेस

प्रिय नरेंद्र मोदी, आम्ही तुमचे ऐकून पाच एप्रिल रोजी दिवे लावू. पण त्याबदल्यात तुम्ही आमचे आणि साथरोगतज्ज्ञ व अर्थतज्ञांचे देखील ऐका.
- पी. चिदंबरम, नेते काँग्रेस