Coronavirus : आता ‘जान भी और जहान भी’

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 12 April 2020

पंतप्रधानांचा घरगुती मास्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हीसीच्या माध्यमातून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी घरगुती मास्क घातला होता अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घातले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्जिकल मास्क घातला होता तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य बड्या अधिकाऱ्यांनीही मास्क घातल्याचे पहायला मिळाले.

नवी दिल्ली - ‘जान भी और जहान भी’ असा मंत्र देतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी रणनीती आखण्याच्या अनुषंगाने विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिलला संपणाऱ्या लॉकडाउनची मुदत किमान पंधरा दिवसांनी, म्हणजे ३० एप्रिलअखेरपर्यंत वाढवावी अशी आग्रही मागणी केली. याबाबत केंद्रही अनुकूल असून तशी घोषणाही लवकरच केली जाऊ शकते. दरम्यान महाराष्ट्राने लॉकडाउनला मुदतवाढ दिल्यानंतर प. बंगालनेही तोच कित्ता गिरवत लॉकडाउन वाढविला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे लॉकडाउन चालू ठेवले तरी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे, शेती, औद्योगिक क्षेत्र आणि मत्स्योद्योगाला यातून विशिष्ट निर्बंध घालून सूट मिळावी अशीही मागणी करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना हॉटस्पॉटमध्ये लॉकडाउन कायम ठेवत आणि बाकीच्या ठिकाणी अंशतः यातून सूट द्या अशी विनंती पंतप्रधानांना केली. चार तासांहून जास्त वेळ चाललेल्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे, केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि कॅ. अमरिंदरसिंग यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी विविध सूचना केल्या. केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे परिणाम दिसण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागेलच, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

लॉकडाउनचे पालन हवे
मोदी म्हणाले की, ‘‘ जान है तो जहान है,  असा संदेश मी जेव्हा राष्ट्राच्या नावे प्रथम संबोधन केले तेव्हा दिला होता. पण आता प्रत्येक नागरिकाचे प्राण वाचवायचे असतील तर जान आणि जहान या दोन्हींचेही रक्षण करणे अत्यावश्यक बनले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसे होईल हे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सुनिश्चित करावे.’’ 

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
देशाच्या काही भागांत डॉक्टर आणि पोलिसांवर झालेले हल्ले तसेच जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतीय राज्यांतील विद्यार्थ्यांवरील हल्ले निषेधार्ह आहेत असे सांगताना पंतप्रधानांनी औषधांचा पुरेसा साठा असल्याचेही स्पष्ट केले. जर औषधे किंवा मास्कचा काळाबाजार आणि साठेबाजी करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मोदींनी दिला.

आजच्या बैठकीमध्ये कोरोनाशी कसा लढा द्यायचा याबाबत रणनीती निश्‍चित करण्यात आली. सरकारच्या निर्देशानुसारच राज्यांमध्ये उपाययोजना राबविल्या जातील. राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतपरी मदत करत असून लोकांनी घरात थांबून सहकार्य करावे.
- बी.एस. येडियुरप्पा, मुख्यमंत्री कर्नाटक

देशभरातील लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावा हे केवळ राजधानी दिल्लीपुरतेच मर्यादित असू नये. केवळ राजधानीत लॉकडाउन करून उद्देश साध्य होणार नाही.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली

सगळ्या देशातील लॉकडाऊनमध्ये किमान पंधरा दिवसांची तरी वाढ होणे गरजेचे आहे. चीन आणि युरोपियन देशांतील स्थिती पाहता कोरोनाविरोधातील ही लढाई दीर्घकाळ चालेल असे दिसते. 
- कॅ. अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री पंजाब

काही राज्यपाल आणि नायब राज्यपाल हे राज्य सरकारांच्या कामांमध्ये हस्तक्षेप करत आहेत त्यांना पंतप्रधानांनीच आवर घालावा अशी विनंती अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
- व्ही. नारायणसामी, मुख्यमंत्री पुद्दुचेरी

राज्यांना त्यांच्या सीमांमध्ये आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी देण्यात यावी. याबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा याचे सर्वाधिकार राज्यांना देण्यात यावे. वाढता संसर्ग लक्षात घेता आंतरराज्य व्यापारावर बंदी हवी.
- भूपेश बघेल, मुख्यमंत्री छत्तीसगड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Discussed with the Chief Ministers of various states