Coronavirus : देशातील १६ जिल्ह्यांत एकही रुग्ण नाही 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 28 April 2020

गेले सलग २८ दिवस या वैश्विक महामारीला यशस्वीपणे रोखून धरणाऱ्या जिल्ह्यांचीदेखील बेरीज होत असून ही संख्या १६ पर्यंत गेली आहे आणि आज यामध्ये महाराष्ट्रातील गोंदियासह आणखी तीन जिल्ह्यांचा समावेश झाला.

नवी दिल्ली - देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ती २८ हजारांच्या घरात गेली आहे. त्याच वेळी गेले सलग २८ दिवस या वैश्विक महामारीला यशस्वीपणे रोखून धरणाऱ्या जिल्ह्यांचीदेखील बेरीज होत असून ही संख्या १६ पर्यंत गेली आहे आणि आज यामध्ये महाराष्ट्रातील गोंदियासह आणखी तीन जिल्ह्यांचा समावेश झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील १६ जिल्ह्यांमध्ये २८ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. यामध्ये गोंदिया बरोबरच देवणगिरी (कर्नाटक) आणि लखी सराय (बिहार) यांचा समावेश आहे. याशिवाय १४ दिवसांमध्ये नवा रुग्ण सापडलेला नाही, असे २५ राज्यांमधील ८५ जिल्हे देशात आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील पिलिभित आणि पंजाबमधील एका जिल्ह्यात अनेक दिवसांनी पुन्हा कोरोनाने डोके वर काढले, ही आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे.

Lockdown : चला आरोग्य जपूया!;आहाराबाबत ही घ्या काळजी...

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल दिलेल्या माहितीनुसार आज अखेर देशांमध्ये २८ हजारांहून अधिक रुग्ण आहेत, ६३६२ जण बरे झाले आहेत आणि ८८६ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या चोवीस तासांमध्ये १४६३ नवे रुग्ण असून ६० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून आतापावेतो २४ तासांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. या यादीमध्ये महाराष्ट्र अजूनही दुर्दैवाने अव्वलस्थानी आहे राज्यात आठ हजार ६८ रुग्ण असून ३४२ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्याच वेळी बरे झालेल्या रुग्णांची संख्यादेखील महाराष्ट्रामध्येच सर्वाधिक म्हणजे ११८८ इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण २२.१७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. 

इंटरनेटने लोकांना ठेवले लॉकडाउन

कोरोनाग्रस्तच नव्हे तर या विळख्यातून मुक्त झालेल्या रुग्णांबरोबरदेखील सामाजिक भेदभावासारख्या घटना वाढू लागले असून त्यामुळेच केंद्राने आज ‘आमची विषाणू बरोबर लढाई आहे, रुग्णांशी नाही,’ असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. कोरोना रुग्णच नव्हेत तर डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आदी कोरोना योद्ध्यांबरोबरदेखील लोकांनी भेदभाव करू नये, असे पुन्हा बजावण्याची वेळ सरकारवर आली आहे. बरे झालेले रुग्ण पुन्हा कोरोना पसरवत नाहीत असे सांगून अगरवाल म्हणाले की, हा विषाणू जात, धर्म पाहून येत नाही. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट समाजाबरोबर भेदभावाची वागणूक करू नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No corona patient in 16 districts