साठेबाजी, काळाबाजार थांबवा; केंद्राची राज्याला सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 9 April 2020

कृषिमंत्र्यांची बैठक 
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लॉकडाऊनच्या काळात शेतीच्या तसेच शेतीपूरक कामांना प्राधान्यक्रमाने सूट दिली जावी. याच्या अंमलबजावणीसाठी नियंत्रण कक्ष स्थापण्याचीही त्यांनी सूचना केली आहे. शेतकऱ्यांना राज्यात तसेच राज्याबाहेरही शेतीमालाची विक्री आणि वाहतूक सुलभपणे करता यावी, त्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मालवाहू गाड्यांच्या वाहतुकीवरील बंदी मागे घेण्यात आली असल्याचेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - लॉकडाउनच्या काळात अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ रोखण्यासाठी तसेच साठेबाजी आणि काळाबाजाराला आळा घालण्यासाठी राज्यांनी जीवनावश्यक वस्तू कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे. गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्यसचिवांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्व औषधे, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन, अन्नधान्य तसेच अन्य जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यांतर्गत योग्य ती परवानगी दिली आहे. मात्र, कामगारांच्या उपस्थिती अभावी उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ होण्याची तसेच साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी राज्यांनी १९९५ चा जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करावा. या कायद्यानुसार सरकारला साठेमर्यादा (स्टॉक लिमिट) तसेच दरमर्यादा ठरविण्याचे व्यापाऱ्यांकडील साठ्याची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. यात गुन्हा सिद्ध झाल्यास दंड व सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. त्याचप्रमाणे राज्ये गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करू शकतात, असेही केंद्राने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notification to the State of the Center for Stop Trading