रूग्णांची संख्या साडेआठ हजारांपुढे; केरळमध्ये नव्या रूग्णांची नोंद थांबली 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 13 April 2020

देशातील पहिला कोरोना रूग्ण आढळलेल्या केरळमधील नव्या रुग्णांची नोंद गेल्या २४ तासांत पूर्णपणे थांबली असून ही सकारात्मक स्थिती मानली जाते. 

नवी दिल्ली  - केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार देशात आजअखेर कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ३५६ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत २७४ लोकांचा मृत्यू झाला असून ७१६ जण बरे झाले आहेत. देशातील पहिला कोरोना रूग्ण आढळलेल्या केरळमधील नव्या रुग्णांची नोंद गेल्या २४ तासांत पूर्णपणे थांबली असून ही सकारात्मक स्थिती मानली जाते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाने महाराष्ट्रात सर्वाधिक १२७, तर मध्य प्रदेशात त्याखालोखाल ३६ लोकांचा बळी घेतला आहे. मागच्या २४ तासांमध्ये देशभरात ९०९ नवे रुग्ण आढळले असून ३४ जण मृत्युमुखी पडले आहेत, त्यातील १७ जण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, सांगली हा भाग धोकादायक बनला आहे 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी भारतामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत अजूनही परिस्थिती चांगली असल्याचे पुन्हा सांगितले, मात्र हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्या सरसकट घेणे हानिकारकच ठरू शकते याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते म्हणाले की, कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या फक्त वीस टक्के रुग्ण गंभीर आहेत. सरासरी काढली तर १ लाख ८६ हजार लोकांच्या चाचण्या केल्यानंतर १ लाख ८६ हजार ९०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच दिवसात दर दिवशी १५ हजार ७४७ चाचण्या करण्यात आल्या. भारतामध्ये औषधांसह मास्क, व्हेंटिलेटर तसेच व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे पीपीई यांचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी पुन्हा नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of coroners in the country has reached 8356