नव्या रुग्णांची संख्या घटू लागली; बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 17 April 2020

देशव्यापी लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम आता दिसायला सुरवात झाली असून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये हळूहळू घट होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

नवी दिल्ली - देशव्यापी लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम आता दिसायला सुरवात झाली असून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये हळूहळू घट होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मागील चोवीस तासांत ९४१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यापूर्वीच्या २४ तासांत हा आकडा १०७६ वर होता. कोरोनाच्या विळख्यातून सावरून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्याही अडीचशेवर गेली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आज अखेर १२ हजार ३८० वर पोचली असून बरे झालेल्यांची संख्याही १ हजार ४८९ वर गेली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १८७ जण मृत्युमुखी पडले असून मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरात आणि तेलंगण या राज्याभोवतीचा कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
रुग्णांचे गणित 
देशातील ज्या १७० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे, त्यात तमिळनाडूतील सर्वाधिक २२ जिल्हे आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये प्रत्येकी अकरा जिल्हे कोरोनाग्रस्त आहेत. आठ राज्यांमध्ये दहापेक्षा कमी रुग्ण आहेत तर इतर १५ राज्यांमध्ये ५० हून कमी रुग्ण संख्या आहेत. 

१४ दिवस - ३२५ जिल्ह्यांत  एकही रूग्ण आढळलेला नाही 
२८ दिवस -  पुद्दुचेरीत  एकही रूग्ण नाही 
१२.७० टक्के  - देशातील एकूण रूग्ण कोरोनामुक्तांचे प्रमाण

ईशान्येकडे प्रादुर्भाव कमी 
चीन सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशासह ईशान्य राज्यांनी कोरोनाला थोपविण्यात मोठे यश मिळविले आहे. नागालँडसारख्या राज्यामध्ये तर आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव अत्यंत कमी होत आहे किंवा तो अजिबात नाही असेही दिसून आले आहे. 

देशातील नवे रुग्ण 
९ एप्रिल : ५४९ 
१० एप्रिल : ६७८ 
११ एप्रिल : ११०६ 
१२ एप्रिल : ९०९ 
१३ एप्रिल : ११५४ 
१४ एप्रिल : १२११ 
१५ एप्रिल : १०७६ 
१६ एप्रिल : ९४१ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of new corona patients began to decline