Coronavirus : राष्ट्रपती भवनात कोरोनाचा शिरकाव; २५ कुटुंबाचे विलगीकरण

वृत्तसंस्था
Tuesday, 21 April 2020

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात वाढत असतानाच धक्कादायक बाबा म्हणजे आता राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात वाढत असतानाच धक्कादायक बाबा म्हणजे आता राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. हा रुग्ण राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा नातेवाईक आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या २५ कुटुंबियांना अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. देशात कोरोनाचा प्रसारामुळे चिंताजनक स्थिती उद्धभवली आहे. राष्ट्रपती भवनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची परिसरातच निवासस्थानं आहेत. हा रुग्ण राष्ट्रपती भवनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोना बाधित रुग्णाला बिर्ला मंदिर संकुलाजवळ असलेल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या दिल्लीत २ हजार ८१ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ४७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत ७६ हॉटस्पॉट केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निश्चित केले आहेत. यातील एका सील केलेल्या परिसरात दोन दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागणं झाल्याचं निष्पन्न झालं होतं. या परिसरात एकाचवेळी ३१ जण करोना पॉझिटिव्ह निघाले होते. चिंताजनक बाब म्हणजे ३१ पैकी १२ रुग्ण हे १० ते १९ या वयोगटातील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One COVID-19 Case Reported In Rashtrapati Bhavan Premises