Coronavirus : प्राणवायूचा पुरवठा करणारे यंत्र तयार

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 10 April 2020

कोरोनाची लागण झालेल्यांना तसेच श्‍वसनविकार असलेल्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वासादरम्यान प्राणवायूचा पुरवठा करणारे उपकरण पुण्यातील जेनरिच मेम्ब्रेन या कंपनीने विकसित केले आहे. या उपकरणाची चाचणी आणि प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तीन महिन्यांत उत्पादन करू शकणाऱ्या कंपन्यांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

नवी दिल्ली  - कोरोनाची लागण झालेल्यांना तसेच श्‍वसनविकार असलेल्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वासादरम्यान प्राणवायूचा पुरवठा करणारे उपकरण पुण्यातील जेनरिच मेम्ब्रेन या कंपनीने विकसित केले आहे. या उपकरणाची चाचणी आणि प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तीन महिन्यांत उत्पादन करू शकणाऱ्या कंपन्यांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्‍वसनाचा त्रास हे कोरोना आजाराचे गंभीर लक्षण असल्याने रुग्णाला वेळेत लागणारा कृत्रिम श्‍वास उपलब्ध करून देणे गरजेचे असते.अतिदक्षता विभागातून सुटी मिळालेल्या रुग्णाच्या उपचारासाठी हे उपकरण फायदेशीर आहे. यासोबतच सीओपीडी, दमा, फुप्फुसाचा आजार, सर्पदंश यावरील उपचारादरम्यान लागणाऱ्या कृत्रिम श्‍वसनासाठी या उपकरणाचा उपयोग होऊ शकतो. कोरोनाग्रस्त रुग्णांची देखभाल करण्यासाठी प्राणवायूयुक्त वैद्यकीय दर्जाच्या हवेची आवश्‍यकता असते. यातील १४ टक्के रुग्णांना कृत्रिम श्‍वसनाची, तर ४ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असते.

या रुग्णांची गरज या उपकरणामुळे भागणार आहे, असे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी सांगितले.  या उपकरणाच्या उत्पादनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे जेनरिचला आर्थिक मदत करण्यात आली. या उपकरणाद्वारे स्वदेशी हॉलो फायबर मेम्ब्रेन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दाबाखाली ३५ टक्‍क्‍यांपर्यंत शुद्ध प्राणवायू पुरविणे शक्‍य आहे. यात तेलविरहीत कॉम्प्रेसर, मेम्ब्रेन कार्टरेज, आउटपूट फ्लो मीटर, आर्द्रतानियंत्रक, नेजल-कॅन्युला, ट्यूबिंग, फिटिंगचा समावेश आहे. यातील मेंब्रेन कार्टरेज ऑक्‍सिजन आणि नायट्रोजन वेगळे करण्यास सक्षम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oxygen gas supply system ready