Coronavirus : अखेर संसदेलाही टाळे!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 मार्च 2020

राष्ट्ररक्षकांना लोकसभेचा सलाम 
कोरोनासारख्या जीवघेण्या आपत्तीचा मुकाबला करणारे वैद्यकीय, तसेच अत्यावश्‍यक सेवा देणारे कर्मचारी, सुरक्षारक्षक यांच्या कर्तृत्वाला संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार कालच ‘जनता कर्फ्यू’नंतर सायंकाळी पाचला जनेतेने टाळ्या, थाळ्या वाजवून पोचपावती दिली होती. त्याच धर्तीवर लोकसभाध्यक्षांच्या आवाहनानंतर सभागृहात उपस्थित सर्व खासदारांनी टाळ्यांचा गजर केला.

देशातील स्थिती...

  • अरुणाचल प्रदेश, दिल्ली, पंजाबमध्ये संचारबंदी जाहीर
  • तेलंगणमध्ये लॉकडाऊन जाहीर
  • तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना विशेष पॅरोल देणार
  • मध्य प्रदेशातील ३५ जिल्हे लॉकडाऊन
  • गोव्याच्या सीमा बंद
  • ओडिशात सर्व न्यायालयांचे कामकाज दिवसातून एकच तास चालणार
  • केरळमध्ये रुग्णसंख्या एकाच दिवसात २९ ने वाढली, एकूण संख्या ९२ 
  • चीनकडून मदतीची तयारी, महत्त्वाची माहिती पुरविणार
  • कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन गुंडाळले 

नवी दिल्ली - कोरोनाच्या भीतीमुळे आज संसदेलाही टाळे लागले. राजकीय पक्ष, खासदारांकडून होणाऱ्या वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय आज घेण्यात झाला. सर्वपक्षीय बैठकीतील सहमतीनंतर लोकसभेत चर्चेविना वित्त विधेयक संमत करून अधिवेशन अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आले. कोरोनामुळे उद्‍भवलेली परिस्थिती पाहता सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी आक्रमक मागणी काँग्रेस आणि द्रमुकने केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील सर्वोच्च सुरक्षित स्थान असलेल्या संसदेच्या परिसरातही कोरोनाच्या उपद्रवाचा परिणाम दिसून आला. सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांची तुरळक हजेरी होती, तर शनिवार आणि रविवारी मतदारसंघात गेलेल्या खासदारांना संसदेत उपस्थित राहता यावे यासाठी लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सुरू होण्याची वेळही दुपारी दोन करण्यात आली होती. परंतु, विमानसेवा बंद असल्यामुळे बहुतांश खासदार दिल्लीत येऊ शकले नाहीत; तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस या पक्षांनी अधिकृतपणे आपल्या खासदारांना संसदेत जाण्याऐवजी मतदारसंघात मदतकार्यात सहभागी होण्याचे आदेश दिले होते. यामुळे रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’नंतर सरकारमध्येही संसद अधिवेशन गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, कामकाज सुरू होण्यापूर्वी लोकसभाध्यक्षांनी दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा केली. त्यानंतर वित्त विधेयक संमत करून लोकसभेचे कामकाज अनिश्‍चित काळासाठी तहकूब केले.

पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा बोलणार, आता काय?

वित्त विधेयक संमत होत असताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आर्थिक पॅकेजची मागणी रेटली. सरकारला हवे तसे सर्व सहकार्य विरोधकांनी केले आहे. किमान सरकारने पॅकेज घोषित करावे, अशी मागणी त्यांची होती. पाठोपाठ द्रमुक नेते टी. आर. बालू यांनीही पॅकेजचा मुद्दा उपस्थित करताना असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांना किमान १५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य द्यावे, अशी सूचना केली. मात्र, वित्त विधेयक मंजुरीला सत्ताधाऱ्यांचे प्राधान्य असल्याने विरोधी नेत्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास वेळ मिळाला नाही. काल निवेदनाद्वारे आर्थिक पॅकेजची सूचना करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी ही मागणी मांडली जात असताना सभागृहात अनुपस्थित होते.

मुख्यमंत्री पटनाईक यांनी दिले 3 महिन्यांचे वेतन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parliament lock by coronavirus