Coronavirus : कोरोनावर आता प्लाझ्मा थेरपीची मात्रा

वृत्तसंस्था
Friday, 10 April 2020

उपचार कसा होतो ?
विषाणू किंवा जिवाणूमुळे झालेल्या आजारातून एखादी व्यक्ती बरी झाल्यावर तिच्या शरीरात त्या विषाणू अथवा जिवाणूला विरोध करणारी प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके शरीरात अल्पकाळ किंवा कायमस्वरूपी राहतात. याचप्रमाणे, कोविड १९ विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा आजारी व्यक्तीच्या रक्तात सोडल्यास ही प्रतिजैविके विषाणूविरोधात काम करतील. ही प्रतिजैविके कोरोना विषाणूच्या बाह्य आवरणावर हल्ला करत त्यांना मानवी पेशींमध्ये घुसण्यापासून रोखतात. 

सर्वाधिक फायदा कोणाला?
अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांवरच प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यास परवानगी आहे. बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून एकदाच काढलेल्या प्लाझ्माचा वापर दोन रुग्णांवर उपचार करण्यासाठी करता येतो. म्हणूनच या थेरेपीचा वापर करण्याची परवानगी मिळालेल्या संशोधन संस्था आजारातून बरे झालेल्यांना प्लाझ्मा देण्याचे आवाहन करत आहेत.

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये आता कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील द्रवाचा (प्लाझ्मा) वापर इतर संसर्गग्रस्तांवर उपचार करण्यासाठी केला जाणार आहे. भारतात प्रथमच हा प्रयोग होणार असून त्यातील निष्कर्षांनंतर या उपचार पद्धतीच्या सरसकट वापराबाबत विचार होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाशी लढा देण्यासाठी केरळ सरकारने स्थापन केलेल्या डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचा सहभाग असलेल्या कृती दलाने भारतीय वैद्यक परिषदेकडे प्लाझ्मा थेरेपीसाठी परवानगी मागितली होती. कोरोनामुळे अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णावरच उपचार करण्यासाठी त्यांना ही परवानगी मिळाली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी अद्यापही लस तयार झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर या उपचारकडे पाहिले जात आहे. अमेरिकेतही गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यास परवानगी आहे. मात्र, अद्याप हवे तसे परिमाण न मिळालेले नाही. 

प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?
या उपचार पद्धतीत कोरोनामुळे झालेल्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील काही प्लाझ्मा काढून हाच आजार झालेल्या व्यक्तीच्या रक्तात सोडला जातो. प्लाझ्मा थेरेपीमुळे रुग्ण ३ ते ७ दिवसांत बरा होऊ शकतो, अशी माहिती तिरुअनंतपुरम येथील चित्रा तिरूनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतील संशोधक डॉ. देवशीष गुप्ता यांनी दिली. ही उपचार पद्धती सुमारे शंभर वर्षे जुनी असून १९१८ ला फ्लू ची साथ आली होती, त्यावेळीही तिचा प्रयोग झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plasma therapy now on the corona