मोदी आज देशाला संबोधित करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 14 April 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. १४) सकाळी १० ला देशाला संबोधित करणार असून कोरोनाशी लढण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या २१ दिवसानंतर तो वाढवण्याबाबत ते घोषणा करण्याची शक्यता आहे.

 नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. १४) सकाळी १० ला देशाला संबोधित करणार असून कोरोनाशी लढण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या २१ दिवसानंतर तो वाढवण्याबाबत ते घोषणा करण्याची शक्यता आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याचे प्रमाण कायम असून आजअखेर सरकारी आकडेवारीनुसार ९१५२ कोरोनाग्रस्त देशात आहेत आणि मृत्यू पावलेल्यांची संख्या ३१० वर पोचली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांनी लॉकडाउनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या चर्चेतही अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढविण्याची मागणी केली होती. दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडीशा आणि तमिळनाडूसह सात बिगर भाजपशासित राज्यांनी हा निर्णय आधीच देऊन टाकला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात येणार हे पुरेसे स्पष्ट असले तरी कृषी आणि लघु तसेच मध्यम उद्योग क्षेत्रात त्याचे दुष्परिणाम जाणवू नयेत यासाठी पंतप्रधान केंद्रीय पातळीवर कोणत्या सवलती याबाबत उत्कंठा आहे. एका माहितीनुसार, सोशल डिस्टनसिंग आणि इतर नियम पाळून छोटे आणि मध्यम उद्योग आदींना सवलती मिळण्याची शक्यता आहे. मात्र दिल्ली, गुरुग्राम, लखनौ, मुंबई, पुणे, सांगली, औरंगाबाद यासह ७६ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन कडकपणे कायम राहणार हेही स्पष्ट झालेले आहे. 

मंत्री कार्यालयांमध्ये हजर  
लॉकडाउन वाढला तरी सरकारी कचेऱ्यांमधील कामकाज सलग महिनाभर बंद ठेवणे प्रशासनाच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांना आजपासून कामावर हजर राहण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. अनेक मंत्रालयांची मुख्यालये असलेल्या शास्त्री भवनात येणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्क्रिनिंग आणि त्यांच्या गाड्यांची सॅनिटायजेशनद्वारे स्वच्छता हे काटेकोरपणे पाळण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुक्तार अब्बास नकवी, गजेंद्र सिंह शेखावत, जितेंद्र सिंग, अर्जुन मुंडा आदी मंत्र्यांनी आज नियमितपणे कामकाज पाहण्यास प्रारंभ केला. 

आणखी वाचा - कायम शेतीवरच का फिरतो नांगर?

भारतात अद्याप अपेक्षित परिणाम का नाहीत? 
- विदेशी, विशेषत: इटली व आखाती देशांतून आलेल्या प्रवाशांचे काटेकोर स्क्रिनिंग करण्याची प्रणाली राबविण्यात दिल्ली वगळता देशातील इतर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर राबवण्यात आलेली ढिलाई. 
- लॉकडाउनची धक्कातंत्राद्वारे घोषणा 
- चाचण्यांची पुरेशी व्यवस्थाच नसणे. 
- अचानक झालेल्या घोषणेमुळे काही हजार रोजंदारी मजुरांची दिल्लीच्या सीमांवर झालेली गर्दी. 
- तबलिगी प्रकरणी दिल्ली पोलिसांचा गाफीलपणा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi to address nation At 10 am