लॉकडाऊन वाढणार की उठविणार ठरणार आज?

वृत्तसंस्था
Saturday, 11 April 2020

काही राज्यांकडून लॉकडाऊन वाढविण्याची विनंती

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा संसर्ग देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील काही राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

देशातील कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, देशातील सर्व भागांमधून लॉकडाऊन उठविणे शक्य होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवला जाईल, असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सरच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. तसेच अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतरच ते लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा करतील, अशी शक्यता आहे.

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यावेळी हा निर्णय घेण्यात आला तेव्हाही पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. त्यानंतरच लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आताही ते दिवसभरात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. विविध राज्यातील परिरस्थितीचा आढावा घेतील, त्यानंतरच पुढील निर्णय घेतील. 

PM Modi

काही राज्यांकडून लॉकडाऊन वाढविण्याची विनंती

कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी कोण-कोणत्या राज्यात लॉकडाऊन वाढवतील, हे आज समजण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रासह इतर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये

महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान या राज्यांसह इतर काही राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या राज्यात लॉकडाऊन वाढवण्यावर विचार केला जाऊ शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi will talk on Coronavirus Issue with State CMs