धक्कादायक ! कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा तलवारीने कापला हात

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

पंजाबमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्यानं कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीनं हातच कापला. यात इतर दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पटियाळातील भाजी मंडई परिसरात ही घटना घडली आहे.

चंदीगढ : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात होत असताना अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाउनची सक्तीनं अंमलबजावणी केली जात आहे. काही राज्यातील काही शहरात कर्फ्यू लावला आहे. अशात पंजाबमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्यानं कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीनं हातच कापला. यात इतर दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पटियाळातील भाजी मंडई परिसरात ही घटना घडली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पटियालामध्ये निहंगा (परंपरेनं शस्त्र ठेवण्याची अनुमती असलेले निळा गणवेश परिधान करणाऱ्या टोळक्यानं पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. निहंगांचा एक गट एका पांढऱ्या गाडीतून पटियालातील भाजी मंडईमध्ये जात होते. यावेळी लॉकडाउन असल्यानं बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्फ्यू पास दाखवण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी निहंगांच्या गटाने गाडी थेट भाजी मंडईच्या रस्त्यावर असलेले बॅरिकेट्स तोडले आणि पुढे निघून गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निहंगांच्या टोळक्यानं पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्यानं एका सहायक पोलिस निरीक्षकाचा तलवारीनं हातच कापला. तर दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

अमेरिकेत कोरोनाचे थैमान; डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

आज (ता. १२) रविवारी सकाळी ही घटना घडली. हरजित सिंह असे या सहायक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. हरजित सिंह यांना जवळच्या राजेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना चंदीगढ येथे हलवण्यात आलं आहे. पटियालाचे पोलिस उपअधीक्षक मनदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला केल्यानंतर हे टोळके घटनास्थळावरू फरार झाले. पोलिसांनी या टोळक्याचा पाठलाग केला. हे टोळके बलवाडा येथील एका गुरूद्वारात लपले आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असं ते म्हणाले.

महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबमधील स्थिती कोरोनामुळे गंभीर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गर्दी थांबवण्यासाठी कायद्याची कडक भूमिका घेत अंमलबजावणी सुरू केली. मात्र, दुसरीकडं पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून कडक पावलं उचलली जात असताना पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यात पंजाबमध्ये घडलेली ही घटना गंभीर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab horror Nihang sikhs attack cops chop off ASIs hand

Tags
टॉपिकस
Topic Tags: