esakal | मोदींच्या भाषणातील महत्वाचे पाच मुद्दे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी १० वाजता देशातील नागरिकांना संबोधित केले व त्यात त्यांनी अनेक मुद्दे मांडले असून देशातील नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व देशात सर्वत्र सुरु असलेल्या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे आपण पाहूया.

मोदींच्या भाषणातील महत्वाचे पाच मुद्दे वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी १० वाजता देशातील नागरिकांना संबोधित केले व त्यात त्यांनी अनेक मुद्दे मांडले असून देशातील नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व देशात सर्वत्र सुरु असलेल्या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे आपण पाहूया.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१. या लॉकडाऊनच्या काळात, देशातील लोक ज्या पद्धतीने नियमांचे पालन करीत आहेत, त्यांनी संयम ठेवून आपल्या घरात राहून उत्सव साजरे केले आहेत. आज, संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाची परीस्थिती सर्वाना माहित आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाचे संक्रमण कसे रोखण्याचा प्रयत्न केला, आपण या घटनेचे भागीदार आणि साक्षीदार आहोत. जेव्हा भारतात कोरोनाची केवळ ५५०  प्रकरणे होती, तेव्हाच २१ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनसाठी भारताने मोठे पाऊल उचलले होते. भारताने सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारला नसता, एकीकृत दृष्टीकोन स्वीकारला नसता, वेगवान निर्णय घेतले नसते तर आज देशात वेगळे चित्र असते. परंतु भूतकाळातील अनुभवांवरून हे स्पष्ट झाले आहे की आपण निवडलेला मार्ग योग्य आहे. जर आपण त्याकडे केवळ आर्थिक दृष्टीकोनातून पाहिले तर ते आता महाग वाटते पण भारतीयांच्या जीवनाशी याची तुलना होऊ शकत नाही. मर्यादित स्त्रोतांमध्ये भारत ज्या मार्गावर चालला आहे त्या मार्गाची आज जगभर चर्चा होत आहे.

२. सर्व प्रयत्नांनंतरही कोरोना ज्या प्रकारे पसरत आहे, त्यामुळे जगभरातील आरोग्य तज्ञ आणि सरकार अधिक सतर्क झाले आहेत. भारतातही कोरोनाविरूद्ध लढा कसा सुरू करावा याविषयी पंतप्रधान मोदी राज्यांशी सतत बोलत आहेत. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय अनेक राज्यांनी आधीच घेतला आहे. सर्व सूचना डोळ्यासमोर ठेवून भारतातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या सर्वांनाच लॉकडाऊनमध्येच रहावे लागेल. या काळादरम्यान, आपण ज्या पद्धतीने काम करीत आहोत त्याच पद्धतीने आपण शिस्त पाळली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला नवीन भागात आता पसरू न देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. जर असे झाले तर देशातील प्रत्येकासाठी ही चिंतेची बाब ठरेल असे मोदी म्हणाले आहेत.

३. २०  एप्रिल पर्यंत, प्रत्येक शहर, प्रत्येक पोलिस स्टेशन, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्याची चाचणी घेण्यात येईल, किती लॉकडाउनचे अनुसरण केले जात आहे, त्या प्रदेशात कोरोनाचा संसर्ग कश्याप्रकारे थांबविण्यात आला आहे, ते पाहिले जाईल. या परीक्षेत यशस्वी होणारे क्षेत्र, जे हॉटस्पॉट्समध्ये नसतील आणि ज्यांचे हॉटस्पॉटमध्ये रूपांतर होण्याची शक्यता कमी असेल, त्यांना २० एप्रिलपासून काही महत्त्वपूर्ण कामांना सशर्त परवानगी दिली जाऊ शकते. कोणीही या कठीण काळात निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मोदींनी केले असून उद्या सरकारकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहे.

४. ज्यांचे रोजच्या कमाईने घर चालते अश्या सर्वांची विशेष काळजी सरकारकडून घेण्यात येणार आहे. सध्या रग्बी पिकांची काढणी सुरु असून शेतकर्यांना कमीत कमी त्रास होईल या पद्धतीने काम करण्यात येणार आहे. देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. जानेवारीत भारतात कोरोनाच्या चाचणीसाठी फक्त एक प्रयोगशाळा होती, आता २२० हून अधिक प्रयोगशाळेत दररोज चाचणी घेण्यात येत आहे. आज भारतात एक लाखांवर बेडची व्यवस्था केली आहे. इतकेच नाही तर अशी ६००  हून अधिक रुग्णालये आहेत, जी केवळ कोविडच्या उपचारासाठी काम करत आहेत. अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

५. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला सप्तपदी सूत्रे देऊन त्यात साथ देण्याची मागणी केली आहे. त्यात घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे, घरगुती तयार केलेले मास्क वापरण्याचे आवाहन मोदींनी केले आहे, आयुष मंत्रालयाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे, तसेच आरोग्य सेतू एप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. आपल्या परिसरातील गरीब कुटुंबांच्या जेवणाची काळजी घेण्याची भावनिक साद मोदींनी आपल्या भाषणातून केली आहे, या कठीण काळात संवेदनशील राहून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कोणालाही नोकरी वरून न काढण्याचे आवाहन मोदींनी उद्योजकांना केले आहे. तसेच या सप्तपदी मध्ये शेवटी कोरोनाच्या विरोधात लढा देणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस यांचा पूर्ण आदर करावा असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. लॉकडाऊन काळात जिथे आहात तिथेच सुरक्षित राहण्याचे आवाहन मोदींनी केले आहे.

loading image