लॉकडाउनमुळे विवाहांवरील निर्बंधांमुळे परिणाम 

वृत्तसंस्था
Monday, 27 April 2020

या दिवशी देशात विविध ठिकाणी विवाह समारंभांचेही आयोजन धुमधडक्यात केले जाते.यंदा कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे लॉकडाउन असल्याने लग्नाचा मुहूर्त चुकला आहे.याचा परिणाम साहजिकच सोन्या-चांदीच्या खरेदीवर झाला

नवी दिल्ली - अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने अनेक नव्‍या कामांचा, उपक्रमांचा श्रीगणेशा त्या दिवशी केला जातो. या दिवशी देशात विविध ठिकाणी विवाह समारंभांचेही आयोजन धुमधडक्यात केले जाते. मात्र यंदा कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे लॉकडाउन असल्याने लग्नाचा मुहूर्त चुकला आहे. याचा परिणाम साहजिकच सोन्या-चांदीच्या खरेदीवर झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘वर्ल्ड गोल्ड कांउन्सिल’च्या अहवालानुसार एका वधूसाठी किमान २०० ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. घरात लग्नकार्य नसले तरी अनेक जण अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करतात. गेल्या वर्षी या मुहूर्तावर सुमारे २३ किलो सोन्याची विक्री झाली होती. पण यंदा कोरोनामुळे सोने खरेदीला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. 

राज्यांमधील परिस्थिती 
लॉकडाउनमुळे समारंभांना बंदी असल्याने थाटामाटातील विवाहांवर निर्बंध आहेत आणि सोने खरेदी होत नसल्याने सराफा व्यवसायाचे पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

विवाह नसल्याने खरेदी नाही 
मध्य प्रदेश - राज्यात दरवर्षी अक्षय्य तृतीयाला एक लाख विवाह होतात. यामुळे दोन तीन हजार कोटींचा व्यवसाय होत असतो. पण यंदा विवाह झाले नसल्याने व्यवसायही थंडावला आहे. राज्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह उपक्रमांतर्गत आज २५ पेक्षा जास्त विवाह होणार होते. कोरोनामुळे ते झाले नाहीत. या उपक्रमावर सरकार १२७ कोटी रुपये खर्च करते. 

मे महिन्यातही परिणाम जाणवेल 
राजस्थान- अक्षय्य तृतीयेला राज्यात होणारे २० हजार विवाह स्थगित झाले आहेत. लग्नसमारंभाशी संबंधित एका व्यावसायिकाच्या अंदाजानुसार १६ ते ३० एप्रिल या कालावधीत २५ ते ३० हजार विवाह होणार होते. पण लॉकडाउनमुळे ते न झाल्याने सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. मे महिन्यात होणाऱ्या विवाहांवरही कोरोनाचा परिणाम जाणवेल, अशी शक्यता एका मांडव व्यावसायिकाने व्यक्त केली आहे. 

चारशे कोटींचे नुकसान 
छत्तीसगड - गेल्या वर्षी या काळात राज्यात आचारसंहिता लागू होती. अक्षय्य तृतीयेला सरकारकडून आयोजित केले जाणारे विवाह समारंभ यंदा कोरोनामुळे होऊ शकले नाहीत. या वर्षी सरकारडून दहा हजार आणि इतर पाच हजार असे १५ हजार विवाहांचा आज मुहूर्त होता. ते आता पुढे ढकलले आहेत. सरकारी विवाहात प्रत्येक जोडप्यावर २५ हजार रुपये खर्च केले जातात. या हिशोबाने सरकारची एकूण तरतूद २५ कोटी रुपयांची असते. राजधानी रायपूरमधील सराफांचे एका दिवसात ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 

व्यवसाय बुडाला 
उत्तर प्रदेश - लखौनेचे समाज कल्याण अधिकारी अमरनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात ५ मे रोजी ५०१ जोडप्यांचे विवाह नियोजित होते. याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार होत. पण लॉकडाउनमुळे हा समारंभ पुढे ढकलला आहे. सराफा दुकाने बंद असल्याने दररोज ७ ते १० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे आदर्श सराफ व्यापार मंडळाचे अध्यक्ष राजेश सोनी यांनी सांगितले. अक्षय्य तृतीयेच्या एका दिवसातील नुकसानाचा आकडा बाराशे कोटींच्या घरात आहे. लखनौमध्ये आज २०० कोटी रुपयांचा व्यवसाय होत असतो. पण यंदा तो बुडाला आहे, असे ते म्हणाले. 

आगाऊ नोंदणीही नाही 
बिहार - अक्षय्य तृतीयेला राज्यातील बाजारपेठांमध्ये उत्साही वातावरण असते. यंदा लॉकडाउनमुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. ‘‘गेल्या वर्षी या मुहूर्तावर सराफ व्यावसायिकांचा ४५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. या वर्षी सर्व काही सुरळीत असते तर ५० कोटींच्या व्यवसायाची अपेक्षा होती. राज्यभरात १०० कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी होत असते. यंदा विवाहसुद्धा स्थगित झाल्याने आगाऊ नोंदणीही नाही,’’ अशी खंत पाटलीपुत्र सराफ संघाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी व्यक्त केली. 

विवाह लांबणीवर 
पंजाब - पंजाबमध्ये बहुसंख्येने असलेल्या शीख समाजातील विवाह गुरुद्वारात गुरु ग्रंथसाहिबच्या साक्षीने होतात. राज्यात १६ ते ३० एप्रिल या काळात आठ हजार विवाह होणार होते. पण लॉकडाउनमुळे अनेक विवाह पुढे ढकलले तर काही विवाह कुटुंबातील दोन-तीन सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: restrictions on marriages due to lockdown