बळीराजाला दिलासा: गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना 

सकाळ न्यूज नेटवर्क 
Thursday, 16 April 2020

लॉकडाउनच्या ३ मेपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात बळीराजा आणि उद्योगांना थोडासा दिलासा मिळू शकेल. आता वीस तारखेनंतर काहीप्रमाणात उद्योगांची चाके फिरू शकतात 

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत वाढ केली असली तरीसुद्धा आज गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी करत कृषीसह उद्योगांना दिलासा देत त्यांच्यावरील निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या ३ मेपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात बळीराजा आणि उद्योगांना थोडासा दिलासा मिळू शकेल. आता वीस तारखेनंतर काहीप्रमाणात उद्योगांची चाके फिरू शकतात 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्मचाऱ्यांत हवे अंतर 
लॉकडाउनचा दुसरा टप्पा पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर गृह खात्यानेही या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि महत्त्वाच्या सेवा सुरळीत राखण्यासाठी सुधारीत आदेश दिले आहेत. यात अनेक सेवांना सूट दिली असली तरी बहुतांश गोष्टींवरील निर्बंध कायम राहतील. कार्यालये, आस्थापने, कारखाने सुरू ठेवण्यास सांगताना कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाची कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

नियंत्रित क्षेत्रांना सूट नाही 
लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांना, रोजगाराला आणि अर्थव्यवस्थेला बसणारी झळ कमी करण्यासाठी निवडक सेवांना सूट दिली जाणार आहे. 20 एप्रिलपासून ही सूट लागू होईल. अर्थात, त्याची अंमलबजावणी राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्हा प्रशासनातर्फे होईल. ही सवलत राज्यांमध्ये असलेल्या नियंत्रित क्षेत्रांसाठी (कंटेन्मेंट झोनसाठी) लागू नसेल. सूट मिळालेल्या क्षेत्रांचा नियंत्रित क्षेत्रांत समावेश झाल्यास त्यातील या सर्व सवलती तत्काळ प्रभावाने निलंबित होतील, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे. 

यांना परवानगी 
कृषी आणि पूरक उद्योग 
निवडक औद्योगिक क्षेत्रे 
डिजिटल अर्थव्यवस्था 
सर्वप्रकारची मालवाहतूक 
चहा, कॉफी, रबर मळे 
ग्रामीण अन्न प्रक्रिया उद्योग 
रस्ते, महामार्ग बांधणी, सिंचन प्रकल्प, 
ग्रामीण भागातील बांधकाम व औद्योगिक प्रकल्प 
मनरेगाअंतर्गत सिंचन व जलसंधारण कामे 
अत्यावश्‍यक हार्डवेअर पॅकेजिंग 
कोळसा, खनिज, तेल उत्पादन 
बॅंका, एटीएम आणि विमा कंपन्या 
ई कॉमर्स तसेच डेटा व कॉल सेंटर 
आरोग्य सेवा 
केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये 

हे बंदच 
रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवासी वाहतूक 
शैक्षणिक संस्था 
हॉटेल आणि रेस्टॉरंट 
चित्रपटगृहे, नाट्यगृहे 
औद्योगिक आणि व्यापारी सेवा 
शॉपिंग कॉम्पलेक्स 
सामाजिक, राजकीय कार्यक्रम 
धार्मिक स्थळे, धार्मिक कार्यक्रम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some relief for farmer and industries