Coronavirus : रविवारी देशभरात असं काही घडलं की....

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 मार्च 2020

भुवनेश्वर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला रविवारी ओडिशामधील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील ४० टक्के भागांमध्ये आठवडाभर टाळेबंदी जाहीर केली आहे.

ओडिशामध्ये कडकडीत बंद
भुवनेश्वर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला रविवारी ओडिशामधील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील ४० टक्के भागांमध्ये आठवडाभर टाळेबंदी जाहीर केली आहे.

ओडिशा सरकारने शनिवारीच आठवडाभर टाळेबंदी कायम राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यातील जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यवसाय बंद ठेवले होते. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवल्या गेल्या. राज्यातील भुवनेश्‍वर, कटक, बेहरामपूर, राउरकेला, संबलपूर आणि बालासोर या शहरांमध्ये पुढील आठवडाभर बंद राहणार आहे. २९ मार्चला रात्री ९ वाजता या राज्यांमधील संचारबंदी शिथिल करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

 • सात जिल्ह्यांमध्ये २९ मार्चपर्यंत बंद
 • घराबाहेर न पडण्याचे नागरिकांना आवाहन

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तमिळनाडूत सातवा रुग्ण पॉझिटिव्ह
चेन्नई -
 तमिळनाडूतील नागरिकांनी रविवारचा संपूर्ण दिवस घरातच राहून काढला. आज राज्यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जनता कर्फ्यूचा कालावधी रात्री नऊवरून सोमवारी पहाटे पाचपर्यंत वाढविला. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपाय केले जात आहेत. तमिळनाडू सरकारने सार्वजनिक वाहतूक, मद्यविक्री, बाजारपेठ आणि व्यावसायिक केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याकामी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. याशिवाय देऊळ, चर्च, मशीद आणि अन्य धार्मिक स्थळेदेखील बंद ठेवण्यात आली. प्रस्तावित विवाह सोहळे स्थगित करण्यात आले आहेत. या महिन्याअखेरीस असणारे विवाहदेखील लांबणीवर टाकण्यात आले. केंद्राने देशभरातील आंतरराष्ट्रीय विमान सेवांना स्थगिती दिली असून, राज्याच्या सीमाही बंद केल्या आहेत. केरळ, कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या सीमा बंद केल्या आहेत. विशेषत: केरळ आणि कर्नाटकच्या बाजूने विशेष काळजी घेतली जात आहे.

 • अत्यावश्‍यक सेवेसाठी लगतच्या राज्याच्या सीमा खुल्या
 • किनारपट्टी, मॉल्स, सिनेमागृहे, शाळा, कॉलेज, विद्यापीठ बंद
 • विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
 • विधिमंडळ अधिवेशनाचे वेळापत्रक बदलले

वंगभूमीत सर्वत्र शुकशुकाट
कोलकता -
 पश्‍चिम बंगालमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. कोलकतासह राज्यात प्रमुख शहरे ओस पडली होती. रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. व्यापारी संकुले, मॉल्स आदी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. याशिवाय रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि विमानतळांवर तुरळक प्रवासी होते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस ठरावीक मार्गावरच सुरू होत्या. काही भागांत पिवळ्या रंगाच्या टॅक्सी दिसत होत्या. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर आला असून, मेट्रो रेल्वेसेवा बंद ठेवली जाणार आहे. आपत्कालीन सेवेसाठी पोलिसांची वाहने रस्त्यावर उभी होती. शहरातील सोसायट्या, कॉलनीतील रस्ते निर्जन पडले होते. मात्र, वृत्तपत्रविक्रेते आणि दूधविक्री केंद्राची सेवा ठरावीक काळापर्यंत सुरू होती. शहरातील मॉल्स, सिनेमागृहे, बाजारपेठा बंद राहिल्याने रस्ते ओस पडले होते. यादरम्यान कोलकत्याचे महापौर फिरहाद हकीम यांनी शहरातील विविध भागांत भेट देऊन स्वच्छताकामांची पाहणी केली. 

 • मेट्रो रेल्वेसेवा ३१ पर्यंत बंद राहणार
 • मालवाहतूक आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार
 • मुंबईहून एक हजार नागरिक हावड्यात दाखल
 • दिवसभरात मेडिकल आणि किराणा दुकान सुरू
 • तुरळक प्रमाणात ऑटो, टॅक्सीसेवा सुरू

लखनौकडे भूमिपुत्रांचा ओढा
लखनौ - उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरे आज पूर्णपणे थांबली होती. राजधानी लखनौमध्ये रुग्णालये वगळता सर्व आस्थापने बंद होती. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी आज लखनौकडे धाव घेतल्याने रेल्वे स्थानके अक्षरशः ओसंडून वाहत होती. या स्थानिक भूमिपूत्रांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. अनेकांना घरापर्यंत पायी चालतच जावे लागले. लखनौमधील मेट्रोसेवा बंद करण्यात आल्याने स्थानकांवर सन्नाटा होता. अनेक ठिकाणांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अयोध्या शहर पूर्णपणे सील करण्यात आले असून, बाहेरच्या व्यक्तीला येथे पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. राज्यातील कत्तलखाने आणि मांस विक्री करणारी दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आली असून, किरकोळ मांस विक्रीवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. व्यापारी आणि उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे त्यांची दुकाने बंद ठेवली असून, लघुउद्योगांची चाके पूर्णपणे थांबली आहेत.

 • राज्याला लागून असलेली नेपाळ सीमा सरकारकडून बंद
 • राज्यामधील सर्व मंदिरे बंद
 • यूपी सरकार कामगारांना भत्ता देणार
 • दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत रेशन
 • राज्याकडून ४२१ कोटींचा विशेष निधी
 • कामगारांना पूर्ण वेतन देण्याचे आवाहन

नऊ जिल्हे ३१ मार्चपर्यंत ‘लॉक डाउन’
बंगळूर -
 बेळगावसह नऊ कोरोनाबाधित जिल्ह्यांमध्ये ‘लॉक डाऊन’ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. हा आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. बेळगावसह बंगळूर, बंगळूर ग्रामीण, मंगळूर, म्हैसूर, गुलबर्गा, धारवाड, चिक्कबळ्ळापूर व कोडगू या नऊ जिल्ह्यांमध्ये हा आदेश लागू राहणार आहे. यामुळे या जिल्ह्यातील व्यावसायिक व्यवहार बंद राहणार असले तरी अत्यावश्‍यक सेवाच सुरू राहणार आहेत. केंद्रीय कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधानांचे मुख्य सचिवांनी रविवारी सकाळी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसमवेत कोरोनासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी देशभरातील ७५जिल्ह्यांत लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत राज्यातील नऊ जिल्ह्यांत ‘लॉक डाउन’ करण्याचे ठरले. याबाबतची माहिती देताना गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, ‘‘फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल. इतर सर्व दुकाने, व्यावसायिक संस्था, गोदामे आदी बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा दुकान, दूध, मासे व मांस विक्रेते, भाजीपाल्याची दुकाने तसेच वैद्यकीय सेवा खुल्या असतील. ऑटो व टॅक्‍सीसेवा सुरू राहील. शेतीविषयक कामे सुरू ठेवण्यास अनुमती दिली जाईल.

 • वैकल्पिक (अल्टरर्नेट) दिवसांना कारखाने सुरू राहणार
 • सार्वजनिक वाहतूक बंद
 • ऑटो व टॅक्‍सीसेवा सुरू 
 • शेतीविषयक कामे सुरू राहाणार

हैदराबादमध्ये संपूर्ण शटडाउन
हैदराबाद -
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार हैदराबादसह तेलंगणमधील इतर भागांत जनता कर्फ्यूला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. हैदराबादमध्ये अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता. करीमनगर, आदिलाबाद, मेहबूबनगर, निझामाबाद जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाचे नागरिकांनी पालन केले.
तेलंगणमध्ये २२ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पुढील २४ तास स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल केले होते. मोदींनी केलेल्या आवाहनाचे स्वागत करत राव यांनी राज्यातील जनतेने रविवारी सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत घरातून बाहेर पडू नये, अशी विनंती केली होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

 • हैदराबादमधील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
 • राज्यांतील अनेक जिल्ह्यांतही ‘जनता कर्फ्‍यू’ला प्रतिसाद
 • हैदराबादेतील रस्त्यांवर सामसूम
 • मेट्रो, टॅक्सी, रिक्षासह सार्वजनिक वाहतूक बंद
 • महाराष्ट्राला लागून असलेली सीमा तेलंगणने सील केली
 • खासगी वाहनांना २३ मार्च पर्यंत तेलंगणात प्रवेशबंदी
 • राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील वाहतूक थंडावली

काश्‍मिरी नागरिकांची उदासीनता
श्रीनगर -
 जगभरातून काश्मीर खोऱ्यात दाखल होत असलेले नागरिक प्रशासनाला सहकार्य करण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी आज केला. देशातील जनतेच्या सुरक्षेला प्रशासनाकडून महत्त्व दिले जात असून, बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला चांगला प्रदिसात मिळाला. सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट होता. जम्मू आणि काश्मीर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले असून, त्याचा आज (ता. २२) चौथा दिवस होता.काश्मीर खोऱ्यात बाहेरून येत असलेले नागरिक प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. प्रभावशाली व्यक्ती आणि निवृत्त अधिकारी आपल्या नातेवाइकांना क्वारंटाइनमध्ये न ठेवता थेट घरी घेऊन जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. श्रीनगरमध्ये २४ ठिकाणी नागरिकांना क्वारंटाइन करून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.   

 

 • राज्यात २४ मार्च रोजी सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर
 • कलम १४४ लागू करण्यात आले
 • क्वारंटाइनसाठीच्या केंद्रांमध्ये सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध 
 • लॉकडाउनचा चौथ्या दिवसात प्रवेश
 • चार दिवसांपासून काश्मीरमध्ये टाळेबंदी
 • बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूकही बंद

बिहार दहशतीच्या सावटाखाली
पाटणा -
 बिहारमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने राज्यात दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आणखी दोघांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये एका महिला रुग्णाचा समावेश असून, तिला ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले. अन्य एका कोरोनाबाधितावर पाटण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये कामाच्या निमित्ताने गेलेले पाच हजार लोक बिहारमध्ये परतू लागल्याने रेल्वे स्थानके ओसंडून वाहू लागली आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर रुग्णांच्या तपासणीची सोय करण्यात आली असून काही स्थानकांवर मात्र याची कसलीच खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रातून आलेल्या एका कुटुंबाला गावकऱ्यांनी सीमेवरच रोखल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंगेरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची तपासणी करणाऱ्या स्वयंसेवक आणि डॉक्टरांशी लोक हुज्जत घालताना दिसले.

 • विमानसेवा रोखण्याची नितीश यांची मागणी
 • मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील आढावा
 • राज्यात ११४ संशयित आढळले
 • मृत रुग्णांकडून अनेकांना संसर्ग

घरून काम करण्याच्या मध्य प्रदेशात सूचना
भोपाळ -
 मध्य प्रदेश सरकारने रविवारी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता सरकारी कार्यालयांतील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सोमवारी ३१ मार्चपर्यंत घरातून काम करण्याचे निर्देश दिले. तथापि आरोग्य, पोलिस, अग्निशमन दल, वीजपुरवठा, स्वच्छता यांसारख्या अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या विभागांना हा आदेश लागू असणार नाही, असे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. हा आदेश राज्य सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. सिंह यांनी जारी केला; तर शालेय शिक्षण विभागाने एका वेगळ्या आदेशात शिक्षकांना घरून काम करण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्यांच्या फोन नंबर व पत्त्यासह त्यांचा सर्व तपशील विभागप्रमुखांना देण्यास सांगितला आहे.

 • शिक्षकांना घरून काम करण्याचे आदेश
 • कर्मचाऱ्यांना आपला सर्व तपशील विभागप्रमुखांना देण्याचे आदेश
 • ३१ मार्चपर्यंत सरकारी कार्यालयांतील अधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

केरळमध्ये एकाच दिवशी १५ नवे रुग्ण
तिरुअनंतपुरम (केरळ) -
 केरळमध्ये आज (ता.२२) पंधरा नवीन रुग्ण आढळले असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७ वर पोचला असल्याची माहिती केरळचे मुख्य सचिव टॉम जोस यांनी दिली.  

आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये एर्नाकुलममधील दोन जण, मलप्पुरम येथील दोन जण, कोझिकोड येथील दोन, कन्नूर येथील चार आणि कासारगुडू येथील पाच जणांचा समावेश असून, यामुळे केरळमधील बाधितांची आकडा ६७ झाला आहे, तर ५९ हजार २९५ जण वैद्यकीय निरीक्षणाखाली असून यातील ५८ हजार ९८१ जणांना त्यांच्या घरी एकांतवासात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तर राज्य परिवहन उपयुक्तता केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), कोची मेट्रो, ऑटो आणि टॅक्सी या सर्व सेवा ३१ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला रविवारी केरळमधील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनीदेखील याला आपला पाठिंबा दर्शवत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते. जनता कर्फ्यूचे पालन करताना राज्याचे मुख्यमंत्री विजयन आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांनी आपापल्या निवासस्थानी दिवस घालवत याचे पालन केले. तर, जनता कर्फ्यूच्या काळात राज्यातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्था सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

 • रविवारी पंधरा नवे कोरोना रुग्ण आढळले
 • राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा स्थगित

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Something happened on Sunday across the country