राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी - नितीन गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 29 April 2020

देशाच्या विविध भागांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी, अशी मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यांकडे केली आहे.

नवी दिल्ली - देशाच्या विविध भागांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी आता उठवावी, अशी मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यांकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध राज्यांच्या परिवहन मंत्र्यांबरोबरच्या व्हिडिओ परिषदेद्वारा त्यांनी ही मागणी करतानाच यामुळे जनसामान्यांचे जीवन सुसह्य होईल याकडेही लक्ष वेधले. अर्थात, या सर्व गोष्टींना पुन्हा सुरवात करताना आरोग्यविषयक दक्षतांचे काटेकोर पालन करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला.

नवरा म्हणाला; सायकलवर फक्त व्यवस्थित बस...

कोरोना विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी त्यांच्या सीमांची नाकेबंदी करुन बाहेरच्या वाहनांच्या प्रवेशास पूर्ण प्रतिबंध केला आहे. यामुळे महामार्गांवर हजारो ट्रक उभे आहेत. तसेच या वाहतूक बंदीमुळे जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने जनसामान्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगून गडकरी यांनी आता ही सीमाबंदी किंवा नाकेबंदी उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. यामुळे देशाच्या आर्थिक प्रक्रियेला देखील गती मिळेल यावरही गडकरी यांनी भर दिला.

गावच्या ओढीने हजारो किमी चालत गावात गेला अन्...

आरोग्यविषयक विविध दक्षता उपायांच्या पालनावर विशेष कटाक्ष आणि काटेकोरपणाच्या पालनाची आवश्‍यकता सांगताना ते म्हणाले की, लहान व मध्यम उद्योगांचे कामकाज पुन्हा सुरु करताना याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि नियमित निर्जंतुकीकरण याचे विशेषत्वाने पालन करावे लागेल. या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या जाण्यायेण्याच्या सोयीसुविधांकडेही लक्ष पुरविण्याचा मुद्दा त्यांनी मांडला. 

लवकरच परिवहन मंत्रालयातर्फे वाहतूकविषयक मुद्यांच्या सोडवणुकीसाठी एक हेल्पलाईन चालू करण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. आगामी पुढाकारांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की आर्थिक गतिमानतेमध्ये रस्ते व महामार्ग बांधणीचे क्षेत्र नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आगामी काळात या क्षेत्रात दुप्पट तिप्पट अधिक कामे हाती घेतली जातील ज्यामुळे रोजगार व नोकऱ्या तसेच आर्थिक गतिमानता ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होईल. यासंदर्भात त्यांनी भूमि-अधिग्रहण प्रक्रियेत राज्यांनी वेगाने काम करावे आणि २५ हजार कोटी रुपयांचा केवळ विनियोग न झालेला निधी त्यासाठी वापरावा.

ग्रामीण भागात टॅक्सीसेवा हवी
ग्रामीण भागात ‘ऍप आधारित’ दुचाकी टॅक्‍सी सेवा सुरु करण्याची कल्पना राबविण्याची सूचना त्यांनी राज्यांना केली. यामुळे शेतकऱ्यांना चांगली सुविधा उपलब्ध होईल व रोजगारनिर्मितीही होईल, असे ते म्हणाले. यासाठी एलएनजी किंवा बॅटरीवरील रिक्षांचाही ते वापर करु शकतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. लॉकडाउन सुरु होण्याच्या वेळी १३१५ प्रकल्पांचे काम सुरु होते. त्यात ४९,२३८ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणीचा समावेश होता. यापैकी ८१९ प्रकल्पांचे काम रखडल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: States should now lift the blockade of their borders nitin gadkari