Coronavirus : ओडिशातील दहा जिल्हे आठवडाभरासाठी बंद

स्मृती सागरिका कानुनगो
रविवार, 22 मार्च 2020

भुवनेश्‍वरमध्ये ‘सम-विषम’ योजना 
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भुवनेश्‍वर महानगरपालिकेने (बीएमसी) खासगी बस, टॅक्सी, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतुकीसाठी ‘सम-विषम’ योजना अमलात आणली आहे. सम क्रमांक असलेली सार्वजनिक वाहने सम तारखेस आणि विषम क्रमांकाची वाहने विषम तारखेला रस्त्यावर आणावीत, असा आदेश ‘बीएमसी’ने काढला आहे. खासगी वाहने, सरकारच्या मालकीची आणि सरकारने भाडेतत्त्वावर घेतलेली, तातडीच्या सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांसाठी हा नियम लागू नसेल.

भुवनेश्‍वर - देशभरात कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असून, या विषाणूमुळे ओडिशामध्ये आत्तापर्यंत दोन रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी उद्यापासून (ता. २२) दहा जिल्ह्यांत संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील खुर्धा, कटक, गंजम, केंद्रपाला, अंगुल, पुरी, राउरकेला, संबलपूर, झारसुगुडा, बालासोर, जाजपूर रोड आणि जाजपूर शहर, भद्रक या जिल्ह्यांमध्ये २२ मार्चला सकाळी ७ ते २९ मार्च रात्री ९ वाजेपर्यंतच्या वेळेत ही टाळेबंदी असणार आहे. भारतात या प्रकरणांची संख्या वाढत आहे. पूर्व-कार्यक्षम कारवाईसाठी आमच्याकडे खूप कमी वेळ आहे. या विषाणूचा कोणताही इलाज नाही. प्रतिबंध हाच यावर एकमेव उपाय आहे. आपण घराबाहेर गेलात तरच आपण विषाणूला आपल्या घरी आणि आपल्या आसपासच्या भागात आणू शकता. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी आम्ही ही कारवाई करत असल्याचे ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनी या वेळी सांगितले. 
या टाळेबंदीच्या काळात या जिल्ह्यांमधील अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्या संस्था, जसे की रुग्णालये, वैद्यकीय दुकाने, किराणा दुकाने, हॉटेल्स (फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी), भाज्या, मांस आणि दुधाची दुकाने/ब्रेड आणि बेकरी (परंतु येथे चहा आणि इतर पेय पदार्थांची विक्री होणार नाही), रेल्वे, बसस्थानक, विमानतळ आणि सार्वजनिक वाहतूक चालू राहील, असेही त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten districts of Odisha closed for the week by coronavirus