Coronavirus : रूग्णालय बंद करण्याची गरज नाही - आरोग्य मंत्रालय

पीटीआय
Wednesday, 22 April 2020

समितीची भूमिका महत्त्वाची
रूग्णालयातील सर्वच रुग्णांवर ते कोरोना संशयित आहेत असे समजूनच उपचार केले जावेत असे सांगतानाच या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रूग्णालयाच्या संसर्ग नियंत्रण समितीच्या भूमिकेवर देखील भाष्य करण्यात आले आहे. या समितीतील सहभागी तज्ज्ञांनी त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाव्यात असे यात नमूद करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने कोरोनाला वगळून अन्य रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकदा रुग्णालयामध्ये कोरोनाचा एखादा संशयित रूग्ण अथवा बाधित आढळून आल्यानंतर त्याचे वेगाने विलगीकरण केले जावे, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जावा आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, यासाठी संपूर्ण आरोग्य केंद्र बंद करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यानंतर देखील याच रुग्णालयामध्ये नव्याने कोविडचा रूग्ण आढळून आला तर त्या रूग्णालयातील तो विशिष्ट विभाग काही काळासाठी तात्पुरता बंद केला जावा पण या विभागाचे निर्जंतुकीकरण पुन्हा ते वापरण्यात यावे असेही सांगितले आहे. दरम्यान, देशात काही भागांमध्ये रुग्णालय कर्मचाऱ्यांनाच विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर ती रुग्णालये बंद करण्यात आल्याचे दिसून आले होते.

कोविड कचऱ्यासाठी मागदर्शक तत्त्वे
कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारादरम्यान निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. यामध्ये दुहेरी थराच्या पिशव्यांचा वापर, अनिवार्य लेबलिंग आणि कलर कोड असणाऱ्या कचरा पेट्यांचा वापर आदी घटकांचा समावेश आहे.

केंद्रीय मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि नियंत्रण समित्या यांना जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन आणि ते नष्ट करण्यासाठी एक सामाईक प्रकल्प कार्यान्वित करण्यास सांगितले असून याच्याशी संबंधित कर्मचारी हे अत्यावश्‍यक अशा मूलभूत आरोग्य सेवेचा घटक असल्याचे सांगण्यात आले आहे. विलगीकरण वॉर्डांमध्ये वेगळ्या कलर कोड असणाऱ्या कचरा पेट्या ठेवण्यात याव्यात तसेच हा कचरा योग्यपद्धतीने वेगळा ठेवणे गरजेचे आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रांपर्यंत हा कचरा काळजीपूर्वक नेला जावा असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no need to close the hospital Ministry of Health