गर्भातील बाळालाही संसर्ग शक्य 

वृत्तसंस्था
Thursday, 16 April 2020

गर्भवती असताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेची प्रसूती होऊन जन्माला आलेल्या बाळालाही या विषाणूची लागण झाल्याची घटना लंडनमध्ये घडली आहे.

नवी दिल्ली - गर्भवती असताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका महिलेची प्रसूती होऊन जन्माला आलेल्या बाळालाही या विषाणूची लागण झाल्याची घटना गेल्या महिन्यात लंडनमध्ये घडली आहे. याबाबत अभ्यास केल्यानंतर, मातेकडून गर्भातील बाळामध्ये विषाणूचे संक्रमण होणे शक्य असल्याचे 'आयसीएमआर' या संस्थेने म्हटले आहे. यानंतर, अशा परिस्थितीत मातेची आणि बाळाची काळजी घेण्याबाबत 'आयसीएमआर'ने मार्गदर्शक तत्त्वेही घालून दिली आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गर्भवती महिलेकडून तिच्या बाळामध्ये विषाणूचे संक्रमण शक्य आहे. मात्र आतापर्यंत किती गर्भवती महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि त्याचा काय परिणाम झाला आहे, याबाबत अद्याप निश्चित आकडेवारी नसल्याचेही 'आयसीएमआर'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच, याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. सध्या, कोरोनाग्रस्त मातेने जन्म दिलेल्या बाळाला संसर्ग झाल्याची आणि न झाल्याचीही उदाहरणे आहेत. प्रसूतीच्या काळात संसर्ग झाल्यास त्याचे विपरित परिणाम शक्य असल्याने संबंधित मातेची आणि तिच्या बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे 'नीति' आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी सांगितले. त्यामुळेच सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करत, कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेची काळजी घेताना डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्वसुरक्षेसाठीही उपाययोजना करावी, अशा सूचना दिल्या आहेत. 

चीनमध्ये २२ फेब्रुवारीला वुहान शहरात जन्माला आलेल्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले बाळ गर्भात असतानाच हा संसर्ग झाल्याचेही सिद्ध झाले. मातेच्या शरीरात असलेली प्रतिजैविके बाळाच्या शरीरात गेली नसल्याचेही दिसून आले. मात्र, आधीच्या ९ प्रकरणामध्ये बाळाला लागण झाली नव्हती. 

त्यामुळे, अशा प्रकारच्या संक्रमणाचे निश्चित स्वरूप आणि प्रमाण समजेपर्यंत 'आयसीएमआर'ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

मार्गदर्शक सूचना 
- आईला आणि बाळाला सुरवातीपासून वेगळे ठेवावे. दोघांच्याही जीवाचा धोका टळेपर्यंत त्यांची विशेष काळजी घ्यावी. 
- या दोघांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांचा अवलंब करावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transmission of coronavirus from mother to baby before birth