घरातून बाहेर पडताना घरगुती मास्क वापरा

पीटीआय
Sunday, 5 April 2020

मास्क निर्मिती उपक्रम...

  • २४ - सहभागी राज्ये
  • १४, ५२२ - स्वयंसहाय्यता गट 
  • ६५, ९३६ - सभासदांचा सहभाग
  • १३२ लाख मास्कची संख्या

नवी दिल्ली - कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना घरगुती पद्धतीने तयार केलेला मास्क वापरण्याचा सल्ला केंद्राने शनिवारी दिला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केला असून सध्या लॉकडाउनमुळे घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. पण महत्वाच्या कामासाठी कोणाला बाहेर पडायचे असेल तर त्या व्यक्तीने तोंड आणि नाक झाकले जाईल अशा घरगुती पद्धतीने तयार केलेला मास्कचा वापर करावा असे सरकारने म्हटले आहे. देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे त्यामुळे नागरिकांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारकडून ही सूचना देण्यात आली आहे.

रेल्वेकडून मास्क, सॅनिटायजरची निर्मिती
भुवनेश्‍वर - पूर्व किनारी रेल्वेने आता त्यांच्या कार्यशाळांमध्ये मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती करायला सुरवात केली आहे. तत्पूर्वी याच विभागाने अनेक डब्यांचे रूपांतर हे विलगीकरण वॉर्डमध्येही केले होते. खुर्दा रोड, वॉल्टेयर आणि संबळपूर या विभागांनी त्यांच्याकडील सर्व स्रोतांचा वापर करून या वस्तूंच्या निर्मितीला सुरवात केली आहे. वॉल्टेयर विभागाने वीस हजार मास्क आणि तीनशे लिटर हँड सॅनिटायजर तयार केले आहे. विशाखापट्टण येथील डिझेल लोकोमोटिव्हमध्ये याची निर्मिती करण्यात आली. गुजरातमध्ये देखील अहमदाबाद रेल्वे विभागाने रेल्वेच्या सत्तर डब्यांचे विलगीकरण वॉर्डांत रूपांतर केले आहे. विशेष म्हणजे या विलगीकरण वॉर्डांमध्ये सर्व अद्यायावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून मणिनगर येथील रेल्वे डेपोमध्ये हे डबे सज्ज ठेवण्यात आले आहेत.

‘आयुष’च्या नियमांचे पालन करा
शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करा असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांना दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे दिवा लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणारे सीबीएसई, यूजीसी, एआयसीटीई, एनसीईआरटी आणि अन्य मंडळांना या संदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.

स्वयंसहाय्यता गटांकडून  १३२ लाख मास्क 
नवी दिल्ली -
 कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी देशातील बचतगटही पुढे आले आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत २४ राज्यांमधील स्वयंसहाय्यता गटांच्या ६५ हजार सदस्यांनी १३२ लाख मास्क तयार केले आहेत. मंत्रालयाने ही माहिती निवेदनाद्वारे दिली. आंध्र प्रदेशमधील पाच जिल्ह्यातील चार हजार २८१ स्वयंसहाय्यता गटांच्या २१ हजार ०२८ सदस्यांनी आणि तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांतील एक हजार ९२७ स्वयंसहाय्यता गटांच्या दहा हजार ७८० सदस्यांनी दहा दिवसांत अनुक्रमे २५ लाख ४१ हजार ४४० आणि २६ लाख एक हजार ७३२ मास्क तयार केले आहेत. बिहार, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील काही राज्यांमधील स्वयंसहाय्यता गटांनीही या कामात भाग घेतला आहे. एकूण १४ हजार ५२२ गटांच्या ६५ हजार ९३६ सदस्य या उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी एकत्रित १३२ लाख मास्कची निर्मिती केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of domestic masks fall out in home