पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला नसता तर?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 11 April 2020

इटली, स्पेन उशिरा जागे
चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झालेला असताना भारताने आधीपासून काही उपाययोजना करण्यास सुरुवात केली. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला. मात्र १७ जानेवारीपासूनच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास परराष्ट्र मंत्रालयाच्या यंत्रणांनी सुरुवात केली होती. असे उपायांची अंमलबजावणी इटलीने २५ दिवसांनंतर, तर स्पेनने  कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर ३९ दिवसानंतर केली होती याकडेही जाणकार लक्ष वेधतात.

नवी दिल्ली - कोरोनाच्या जागतिक साथीच्या सुरवातीच्या काळात २४ मार्चला देशात लॉकडाउन जाहीर झाला नसता तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या आत्तापर्यंत ८ लाख २० हजारांवर पोचली असती आणि इटलीसारखा हाहाःकार उडाला असता, असे निरीक्षण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अहवालात नोंदविण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आयसीएमआर’च्या अहवालात म्हटले आहे की लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केला नसता तर १५ एप्रिलपर्यंत देशातील हजारोंच्या रुग्णसंख्येने किमान ८ लाख २० हजारांचा टप्पा ओलांडला असता. या अहवालाबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून विदेशी पत्रकारांना देण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी ही माहिती देताना याचा उल्लेख केला आहे. लॉकडाउन देशात अत्यंत योग्य वेळेला लागू करण्यात आले, असे ‘आयसीएमआर’चे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. 

लॉकडाउन जारी केले नसते तर भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्येच्या प्रचंड देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे संक्रमण वेगाने पसरले असते आणि एक धोकादायक आणि हाहाःकार उडवणारी परिस्थिती निर्माण झाली असती. तशी परिस्थिती सावरणे देश आणि राज्याच्या यंत्रणांना अत्यंत कठीण गेले असते, असेही या संस्थेचे निरीक्षण आहे. कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण किमान ४०६ लोकांना संसर्गाचा विषारी प्रसाद देऊ शकतो, असेही संस्थेच्या एका अन्य अहवालात म्हटले आहे.

भारतात संकट टळलेले नाही. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार देशातील सध्याची कोरोना संशयित रुग्णांची संख्या सहा हजार ४१२ आहे. पण कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झालेल्यांची संख्या पाच हजारांच्या घरात आहे. भारतातील रुग्णसंख्येच्या ८० टक्क्याहून जास्त लोक दिल्ली, मुंबई,  पुणे, इंदूरसह ७८ जिल्ह्रयांपुरतेच मर्यादित आहेत.

सुरुवातीला नकारात्मक भूमिका
दरम्यान, याच आयसीएमआरच्याच फेब्रुवारीत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतामध्ये लॉकडाउन लागू करणे हे योग्य नसल्याचे निरीक्षण मांडले गेले होते. प्रणव चटर्जी आणि इतर ज्येष्ठ संशोधकांनी तो निरीक्षण अहवाल सादर केला होता. भारतात लॉकडाउन लागू केले आरोग्य यंत्रणेला त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती त्या अहवालात व्यक्त करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what would have happened lockdown was not declared India coronavirus