आफ्रिकेत कोरोनामुळं तीन लाख जीव जाण्याचा धोका

टीम ई-सकाळ
Saturday, 18 April 2020

जगातील गरीब देशांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून जगातील प्रत्येक ठिकाणी कोरोनाच्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे.

Coronavirus : जगभरात कोरोनाचा कहर अजूनही सुरूच असून संपूर्ण जगात कोरोनाचे सध्या २२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण असून त्यातील १ लाख ४८ हजार ७५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता सर्वच देशांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. कोरोनाचे संक्रमण संपूर्ण जगात दिवसेंदिवस वाढतच चालले असून अजूनही यावर कोणताही उपचार मिळालेला नाही. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जरी जाहीर करण्यात आला असला तरी, ही संख्या आता वाढतच चालली आहे. या कोरोनाचा कहर आता जगातील गरीब देशांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून जगातील प्रत्येक ठिकाणी कोरोनाच्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश झाला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत १.४८ लाखांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे, आफ्रिकेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आयोगाच्या अहवालात आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ३ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आकडा प्रसिद्ध करताना अहवालात म्हटले आहे की, सामान्य परिस्थितीत तीन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि जर परिस्थिती बिघडली आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न न केल्यास आफ्रिकेत ३३ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो व आफ्रिकेत १२० कोटी लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो.

आणखी वाचा - ऑलम्पिकच्या तयारीत रमलेल्या जपानमध्ये धोका वाढला

सयुंक्त राष्ट्राच्या या अहवालाचे आकडे सर्वाना धक्का देणारे आहेत. जर ही परिस्थिती झाली तर संपूर्ण जगावर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आफ्रिकेत अनेक छोटे छोटे राष्ट्र या कोरोनाच्या कचाट्यात सापडले असून तेथील आर्थिक परिस्थिती सुद्धा कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरू शकते. आफ्रिकेत अनेक आदिवासी राष्ट्र असून त्यांचाकडे वैद्यकीय उपकरणे सुद्धा उपलब्ध नाहीत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आवाहन आता आफ्रिकेसमोर असून जर तसे करण्यात अपयश आले तर १२० कोटी लोकसंख्येवर याचा परिणाम होऊन त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील.

आणखी वाचा - अमेरिकेत एकादिवसात साडे चार हजार बळी

इम्पीरियल कॉलेज लंडनच्या एका संशोधनाच्या आधारे गणना करतांना अहवालात असे म्हटले आहे की, या खंडात सोशल डीस्टंसिंगचे योग्य पालन जरी केले गेले आणि परिस्थिती चांगली राहिली तरी  १२ कोटीपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. आफ्रिकेतील वैद्यकीय उपकरणांच्या अभावामुळे आफ्रिकेत गंभीर परिस्थिती निर्माण होईल असे तज्ञांचे मत आहे. आफ्रिकेत सध्यातरी कोरोनाच्या संक्रमणाचे १८,००० रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या सध्या जरी कमी वाटत असली तरी युरोप नंतर अनेक दिवसांनी आफ्रिकेत त्याचे संक्रमण पाहायला मिळाले असून सध्या संक्रमण सुद्धा त्याच गतीने होत असल्याने तिथे खूप मोठा कोरोनाचा धोका असल्याची भीती तज्ञांद्वारे व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: africa could have three lakh deaths coronavirus