coronavirus : आफ्रिकी नागरिकांची चीनमध्ये मुस्कटदाबी

पीटीआय
Tuesday, 14 April 2020

द्विपक्षीय व्यापार 
मागील वर्षी चीन आणि आफ्रिकी देशांतील व्यापार हा २०८ अब्ज डॉलर एवढा होता. चीनने देखील आफ्रिका खंडात हातपाय पसरण्यासाठी अनेक देशांत मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या गरिबीच्या  खाईत असलेल्या आफ्रिकी देशांना आश्रित करण्याचा चीनचा डाव आहे. ताज्या घटनेमुळे चीनच्या तेथील  अर्थकारणालाही फटका बसू शकतो.

संसर्गाच्या संशयामुळे विलगीकरण केंद्रांत डांबले  
बीजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूच्या उद्रेकाची मोठी झळ आता तेथील आफ्रिकी नागरिकांना बसू  लागली असून चीन सरकार कोरोना प्रतिबंधाच्या नावाखाली  त्यांची मुस्कटदाबी करत असल्याची बाब उघड झाल्यानंतर नव्या राजनैतिक वादाला तोंड फुटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चीन सरकार जाणीवपूर्वक आफ्रिकी लोकांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला जात आहे. मागील आठवड्यात ग्वान्गझू  शहरात वास्तव्यास असणाऱ्या काही आफ्रिकी विद्यार्थी आणि नागरिकांना चिनी अधिकाऱ्यांनी तपासणीच्या नावाखाली विलगीकरण केंद्रात डांबल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. काही घर मालकांनी आफ्रिकी नागरिकांना घरे तसेच हॉटेलांत राहण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.   

सध्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असून स्थानिक मंडळी  त्यासाठी बाहेरून आलेल्या लोकांना जबाबदार धरत आहेत .याचा  मोठा फटका आफ्रिकी नागरिकांना बसू लागला असून त्यांच्याकडे संशयाच्या नजरेतून पहिले जात आहे. चीन सरकारच्या  दडपशाहीचे तीव्र पडसाद आफ्रिकी देशांत उमटू  लागले असून तेथील माध्यमांनी देखील सरकारच्या  भूमिकेवर टीका करायला सुरवात केली आहे. बाहेरून आलेल्या लोकांमुळेच देशात  संसर्गाची दुसरी लाट  उसळल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनमध्ये आफ्रिकी नागरिकांच्या होत असलेल्या छळाचे व्हिडिओ  व्हायरल झाले असून त्यावर आता  आफ्रिकी देशांत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केनिया, युगांडा, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आदी देशांतील माध्यमांनी चीन सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. दरम्यान याचा विपरित परिणाम चीन आणि आफ्रिकी देशांतील द्विपक्षीय संबंधावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने  मात्र आफ्रिकी नागरिकांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या बाबीचा इन्कार केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: African Citizens Trouble in China